Join us  

समन्स बजावल्यानंतर अर्शद खान नॉट रिचेबल; घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 9:46 AM

पुन्हा समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले असून गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी अर्शद खान याला समन्स बजावल्यानंतर तो गायब झाला आहे. त्याला पुन्हा समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले असून गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे.

घाटकोपर येथे होर्डिंगला परवानगी दिल्यानंतर आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून जान्हवी मराठे हिने ‘इगो’च्या खात्यातून अर्शद खानला काही धनादेश दिल्याचे भावेश भिंडे याने गुन्हे शाखेला सांगितले. परवानगी मिळाल्याच्या तीन महिन्यांत हे होर्डिंग उभे राहिले. गुन्हे शाखा अर्शदच्या बँक खात्याचा लेखाजोखा तपासात आहे. आतापर्यंत त्याच्या बँक खात्यात ६० लाखांहून अधिकचा व्यवहार झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात अर्शदला नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, खालिद यांच्या पत्नी सुमाना यांनी माहापारा नावाची कंपनी स्थापन केली असून, अर्शद हा या कंपनीचा संचालक आहे. त्यामुळे अर्शद मार्फत सर्व व्यवहार होत असल्याचा संशय आहे.

फटाके विक्रीतही सहभाग...

राज्य रेल्वे पोलिस दलातील सहायक फौजदार संजय भोईर याने २०२१ मध्ये आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार: खालिद यांनी उमासन आणि खान एंटरप्रायझेस या वितरकांचेच फटाके विकत घ्यावेत, अशी सक्ती केली. या कंपन्या हर्षद पटेल, अर्शद खान यांच्या आहेत. हे दोघे खालिद यांचे नातेवाईक आहेत. त्यांना फायदा व्हावा, या हेतूने खालिद यांनी फक्त सक्तीच केली नाही तर फटाक्यांची विक्री, वितरणासाठी रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ, मालमत्तेचा वापरही केला. फटाके वाहून नेताना पोलिस आयुक्तालयाचे वाहन जळून खाक झाले.  

 

टॅग्स :घाटकोपर