लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यात राहत्या घरी आत्महत्या करणारे आर्ट डायरेक्टर राजू सापते यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी, भाजपचा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष आणि शक्ती जनहित मंच नामक संस्थेचा अध्यक्ष गंगेश्वर श्रीवास्तव ऊर्फ संजू याला दिंडोशी पोलिसांनी रविवारी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा मुंबईत दाखल होता. त्यानुसार पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्म सिटीत काम करणाऱ्या एका कामगाराची अडीच लाख रुपये थकबाकी होती. जी देण्यासाठी श्रीवास्तवने त्याला धमकावत त्याच्याकडून अधिक पैशाची मागणी केली. त्यानुसार कामगाराने त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्याच प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले. सापते यांच्याकडूनही खंडणी वसूल करण्यात आली होती. त्यासाठी ज्या हॉटेलमध्ये मिटिंग घेण्यात आली, तिथे श्रीवास्तव हजर होता. या तणावातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपविले. सापते यांच्या पत्नी सोनाली यांनी याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.