Join us

कलानगरात साकारतोय आर्ट डिस्ट्रिक्ट प्लाझा; सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनासाठी सुविधांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:22 AM

उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागा म्हटले की राडारोडा पडलेला भाग, गलिच्छ ठिकाण हे नेहमीचे असलेले चित्र बदलू लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे येथे साकारण्यात येत असलेल्या बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट प्लाझाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्य:स्थितीत या प्लाझाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या मे महिन्यात हा प्लाझा वांद्रेकरांसाठी खुला होणार आहे. त्यातून उड्डाणपुलांखालील गलिच्छ मोकळ्या जागांची जागा आता आकर्षक बैठक व्यवस्था, रोषणाई, मनोरंजनाच्या सुविधा असलेल्या आधुनिक प्लाझाने घेतलेली पाहायला मिळणार आहे. 

उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागा म्हटले की राडारोडा पडलेला भाग, गलिच्छ ठिकाण हे नेहमीचे असलेले चित्र बदलू लागले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे परिसरातील मोकळ्या जागांचे आकर्षक अशा आर्ट प्लाझामध्ये रूपांतरण करण्यास सुरुवात केली आहे. कलानगर येथील नंदादीप उद्यानाच्या शेजारील आणि सी लिंक व बीकेसीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील जागेवर मिठी नदीच्या किनाऱ्यावर हा प्लाझा उभारला जात आहे. 

१०५४५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हा प्लाझा साकारला जात असून विविध प्रकारची फूलझाडे, बसण्यासाठीच्या सुविधा उभारल्या जात आहेत. त्याचबरोबर फेस्टिव्हलदरम्यान विविध कार्यक्रम करता यावेत यासाठी खुला रंगमंचही उभारला जात आहे. एकाच वेळी सुमारे १०० प्रेक्षक या रंगमंचाच्या पायऱ्यांवर बसू शकतील. 

प्लाझाची वैशिष्ट्ये    कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी खुला रंगमंच    आकर्षक आणि सुगंधी फुलांची गार्डन,     आकर्षक रोषणाई    विविध प्रकारच्या सुंदर शिल्पांची रचना     मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसह गप्पा मारत बसण्यासाठी, चालण्यासाठी जागा    रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोबाइल फुड ट्रकसाठी जागा

बीकेसी हे आंतरराष्ट्रीय बिझनेस हब आहे. या आर्थिक केंद्राला आर्ट प्लाझाच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्राची जोड मिळणार आहे. वांद्रे भागातील सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे चालना मिळेल. त्यातून येणाऱ्या काळात हा आर्ट प्लाझा नावलौकिक निर्माण करील. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

मुंबई शहराची जगात स्वतःची एक ओळख आहे. या ओळखीला नावीन्य देण्याचा आमचा प्रयत्न विविध प्रकल्पांतून होत आहे. यात शून्य ब्रिज, बीकेसी आर्ट प्लाझा, आदी संकल्पनांचा समावेश आहे. मुंबईकरांसाठी बीकेसी आर्ट प्लाझा ही सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीकरिता एक हक्काची जागा निर्माण होत आहे. कलाकारांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी आणि समुदायाला एकत्र येत कलेच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान होणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए