मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:50 AM2023-12-18T09:50:32+5:302023-12-18T09:52:07+5:30

दुबईच्या धर्तीवर मुंबईत नव्या वर्षात जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती कलादालन उभारण्यात येणार आहे.

Art gallery to be set up at Mumbai Festival to showcase rare photographs to Mumbaikars | मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला

मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला

मुंबई : दुबईच्या धर्तीवर मुंबईत नव्या वर्षात जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती कलादालन उभारण्यात येणार आहे. त्यात शहर, उपनगरात हॅपी स्ट्रीट, योगा बाय द बे, आरोग्यम किड्झथाॅन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे मुंबई शहराला कॅमेऱ्यात कैद केलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना या फेस्टिव्हलच्या निमित्ताने मुंबईकरांसह पर्यटकांच्या भेटीला येणार आहे.

राज्य शासनाचा पर्यटन विभागाच्या वतीने हा फेस्टिव्हल २० ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणण्याचा मानस आहे.
 
 जागतिक स्तराच्या या फेस्टिव्हलमध्ये इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, म्युझिक फेस्ट, अर्थ मूव्ही कॉन्टेस्ट, बिच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महाशॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो, या उपक्रमांचा समावेश आहे. 

 या उपक्रमांमध्ये शहरातील कलादालन, मोठी संग्रहालये, उद्याने, सिनेमागृहांचा सहभाग असणार आहे.

अनोख्या उत्सवाचे साक्षीदार :

नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य, सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. प्राचीन मुंबई कशी बदलत गेली, स्वप्नांच्या शहराने कोविडवर कशी मात केली, ही सर्व स्थित्यंतरे कलात्मक पद्धतीने अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे.

Web Title: Art gallery to be set up at Mumbai Festival to showcase rare photographs to Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.