Join us  

कलाप्रेमींनी एशियाटिकच्या पायऱ्यांवर बसून अनुभवले संगीताचे सूर; मुंबई संस्कृती महोत्सवाला भरघोस प्रतिसाद

By स्नेहा मोरे | Published: January 15, 2024 6:41 PM

मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर बसून कला प्रेमी- श्रोत्यांनी ही सांगीतिक मैफिल अनुभवली.

मुंबई - शास्त्रीय संगीत, दिग्गज गायक - वादक आणि कला दर्दींच्या उपस्थितीत नुकतेच मुंबई संस्कृती महोत्सवाचे ३२ वे पर्व उत्साहात पार पडले. या महोत्सवातील प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांच्या बासरीवादनाने महोत्सवाचे वातावरण अक्षरशः चैतन्यमय झालेले दिसून आले. चौरसिया यांनी लोकसंगीत आणि आधुनिक संगीताचा उत्तम मेळ कला रसिकांसमोर सादर केला. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे , मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर बसून कला प्रेमी- श्रोत्यांनी ही सांगीतिक मैफिल अनुभवली.

हर्निमल सर्कल येथे पार पडलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून शहर उपनगरातील ऐतिहासिक, हेरिटेज स्थळांच्या जतन- संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात कला रसिकांनी दर्शविलेली उपस्थिती आणि मिळालेला प्रतिसाद हा या उद्देशपूर्तीच्या सकारात्मक असल्याची बाब आयोजकांनी सांगितली. तसेच, महोत्सवातील तरुण पिढीचा सहभागही अत्यंत वाखाण्याजोगा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या महोत्सवात राकेश चौरसिया यांना कलाकार रितिक चौरसिया यांनी साथ दिली.

याखेरीस, महोत्सवात ओजस अधिया, श्रीधर पार्थसारथी, संजोय दास, शिखर नाद कुरेशी , इंडियन हेरीटेज सोसायटीच्या सचिव प्रिती वनागे, डॉ. अनिल काशी मुराका, अदिती शर्मा , राहुल पटेल यांचीही उपस्थिती होती. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवाने मुंबापुरीत १९९२ पासून सुरुवात केली आहे. अनिता गरवारे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर बाणगंगा महोत्सवाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या महोत्सवाचे रुपांतर इंडियन हेरिटेज सोसायटीच्या मुंबई संस्कृती महोत्सवात करण्यात आले. या महोत्सवाच्या अनुषंगाने एकाच वेळी मुंबईतील ऐतिहासिक स्थापत्यशास्त्र आणि संगीताचा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी कला रसिकांना मिळते.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र सरकार