लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्जातून विद्यार्थ्यांचे ‘कला गुण’च गायब झाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक शाळांमध्ये सोमवार सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची गर्दी जमली होती. पण, अनेकांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. आॅनलाइन अर्जाचा दुसरा अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. या अर्जात विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरायचा असतो. त्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थी महाविद्यालयांचा पसंतीक्रम घेऊन गेले होते. पण, आॅनलाइन अर्जांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले ‘कला गुण’ दर्शवले जात नव्हते. त्यामुळे पसंतीक्रमातील महाविद्यालयाच्या कटआॅफ लिस्टपेक्षा कमी दिसत होते. त्यामुळे आता पसंतीक्रमानुसार प्रवेश कसा मिळणार, असा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना पडला आहे. सोमवारी शाळांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे महाविद्यालयांची कट आॅफ लिस्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या गुणांनुसार १० ते १२ महाविद्यालयांची यादी सोबत आणली होती. परंतु आॅनलाइन अर्ज भरताना अर्जामध्ये ‘कला गुण’ दर्शवले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे १० ते २० गुण कमी दर्शवले जात होते. त्यामुळे त्यांनी तयार करून आणलेल्या महाविद्यालयांच्या यादीमधील महाविद्यालयांचे कट आॅफ गुण हे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळ उडाला. कला गुण का दर्शवले जात नाहीत याची माहिती अनेक शिक्षकांनाही नसल्याने शिक्षकही गोंधळले होते.
अर्जातून ‘कला गुण’ गायब!
By admin | Published: June 20, 2017 2:36 AM