दिवाळीपूर्वी अर्थगाडा रुळावर; लोकलसह जादा एसटी धावणार, राज्य सरकारची रेल्वेला शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 07:21 AM2020-10-29T07:21:24+5:302020-10-29T07:52:06+5:30
Coronavirus Unlock News : राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव रेल्वेला पाठविला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेची सेवा आता सर्वांसाठी खुली करावी, अशी शिफारस राज्य सरकारने रेल्वे विभागाला केली आहे. तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या जादा फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याने दिवाळीपूर्वी राज्याचा अर्थगाडा रुळावर येणार आहे. राज्य सरकारने सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव रेल्वेला पाठविला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असून मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याच्या मनस्थितीत आहे. त्याचाच भाग म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर व्यायमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
आता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वेसेवा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. तसे पत्रही सरकारने रेल्वे विभागाला पाठवले आहे. रेल्वे विभागही यामागणीवर सकारात्मक विचार करत असल्याचे समजते.
प्रवासाची वेळ विभागून देण्याची मागणी
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिलेल्या प्रस्तावात सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी ८ ते १०.३० दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू ठेवा.
तर सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, सायंकाळी ५ ते ७.३० ही वेळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ठेवा, तर सायंकाळी ८ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सामान्य व्यक्तींना प्रवासाची मुभा द्या, तसेच दर एक तासाने महिला लोकल सोडा, असे त्यांनी म्हटले आहे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये जादा एसटी धावणार
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाने ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बस स्थानकांवरून सुटणार असून, टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.
रस्त्यांवर गर्दी वाढली
सर्वसामान्यांना लोकल बंद असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक भागांत १ ते ३ तास ट्रॅफिक जाम असते. शिवाय, सिटीबसमध्येही गर्दी होत असल्याने त्यातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. लोकल सुरु झाली तर रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकेल.
सप्टेंबर महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा
नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतीने सुधारली असून, मागणी व व्यावसायिक घडामोडी वाढल्यामुळे कोविड-१९ महामारीच्या धक्क्यातून सावरण्यास अर्थव्यवस्थेला मदत झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, निर्यातीसह आठपैकी पाच संकेतकांनी सप्टेंबरमध्ये चांगली सुधारणा दर्शविली आहे. उरलेले तीन संकेतक स्थिर असल्याचे दिसून आले आहेत. अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे.