कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये सांधेदुखीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:10 AM2021-09-10T04:10:03+5:302021-09-10T04:10:03+5:30
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत नाही तर, तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. कोरोनाची तिसरी लाट येणार, असे ...
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत नाही तर, तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. कोरोनाची तिसरी लाट येणार, असे भाकीत आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात असताना आता कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये सांधेदुखी, श्वसनविकार तसेच शारीरिक आणि मानसिक थकवा वाढल्याचे दिसून येत आहे.
याविषयी माहिती देताना फिजियोथेरेपी प्राध्यापिका डॉ. माधवी डोके सांगतात, ‘पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना विविध प्रकारच्या समस्या होत असून, यातील मुख्य समस्या म्हणजे सांधेदुखी आहे. शंभरातील वीस नागरिकांना याचा त्रास होत आहे. अनेक कोरोनामुक्त व्यक्तींना घरी गेल्यानंतरही अस्वस्थ वाटत असून सांधेदुखी, स्नायूदुखी, थकवा येणे, या आणि अशा बऱ्याच तक्रारी जाणू लागल्या आहेत. याची रुग्णसंख्या निश्चित नसली तरी सांधेदुखीच्या समस्येत नक्कीच वाढ झाली आहे. याकरिता बऱ्याच विशेष शासकीय, खासगी आणि महापालिकेच्या रुग्णलयात पोस्ट-कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
सांधेदुखीची कारणे
लॉकडाऊनमुळे शरीराची थांबलेली हालचाल
कॅल्शियमची कमतरता
कोरोनामुळे आलेला अशक्तपणा
वाढत्या वयानुसार आलेला थकवा
सांधेदुखीवर उपाय
सांधेदुखीवर उपाय म्हणजेच फिजियोथेरेपी हाच आहे. नियमित फिजियोथेरेपीच्या मदतीने सांधेदुखी खूप प्रमाणात कमी होऊ शकते. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनामुक्त झालो म्हणजे आजारमुक्त झालो, असा गैरसमज करून घेऊ नये. कारण कोरोनाच्या संक्रमणामुळे शरीरातील अनेक पेशींचे नुकसान झालेले असते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित उपचार करणे गरजेचे आहे. याशिवाय योग्य व्यायाम व उपचार, फिजिओथेरपी निदान व उपचार तसेच सांधेदुखी, मानदुखी, कंबर दुखणे, गुडघ्यांच्या समस्या, स्नायूंचे व मज्जातंतूंचे विकारांवर नियमित फिजिओथेरपीमुळे आजार, दुखापत किंवा विकारांमुळे होणाऱ्या त्रासांपासून सर्व वयोगटातील लोकांना दिलासा मिळू शकतो. उच्च-गुणवत्तेच्या फिजिओथेरपीच्या सहाय्याने वेदना पूर्व-तंदुरुस्ती आणि तंदुरुस्तीची पातळी पुनर्संचयित करू शकतो. सक्रिय आणि निरोगी आयुष्य जगू शकतो हाच संदेश जागतिक फिजियोथेरेपी दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना दिला गेला.