मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत १ ऑगस्ट रोजी अटक केली. यानंतर ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने ही भेट नाकारली आहे.
उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना भेटायचे असेल, तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाने कळवल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नाही
एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांना तुरुंगात भेटण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने एका व्यक्तीचा तुरुंग प्रशासनाकडे फोन आला होता. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचे आहे, असे सांगण्यात आले. मात्र तुरुंग अधीक्षकांनी राऊत यांना भेटायचे असेल तर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेटावे लागेल आणि ही भेट घेण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सांगितले.
दरम्यान, तुरुंगातील नियमांनुसार, केवळ रक्ताचे नाते असणाऱ्या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येते. इतर कोणाला कैद्याला भेटायचे असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.