आर्थर रोड कारागृहातील ‘सत्याचे प्रयोग’ यशस्वी

By admin | Published: March 14, 2016 02:09 AM2016-03-14T02:09:32+5:302016-03-14T02:09:32+5:30

गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नाही, कारण गुन्हेगारांचेही हृदयपरिवर्तन शक्य आहे,’ हे गांधीजींचे म्हणणे आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील सुमारे ८९ कैद्यांनी सिद्ध करून दाखवले आहे

Arthur Road Jail's 'Truth Experiment' in Jail | आर्थर रोड कारागृहातील ‘सत्याचे प्रयोग’ यशस्वी

आर्थर रोड कारागृहातील ‘सत्याचे प्रयोग’ यशस्वी

Next

मुंबई : ‘गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नाही, कारण गुन्हेगारांचेही हृदयपरिवर्तन शक्य आहे,’ हे गांधीजींचे म्हणणे आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील सुमारे ८९ कैद्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या कैद्यांनी गांधीजींच्या जीवन व कार्यावर आधारित साहित्याचे वाचन करून ‘गांधी शांती परीक्षा’ दिली. यात फाशीची शिक्षा झालेले ४ कैदी आणि ‘अंडा सेल’मधील १० कैद्यांचा समावेश होता. ‘अंडा सेल’मधील दोन कैद्यांनी या परीक्षेत ८०पैकी ७९ गुण मिळवून प्रथम स्थान मिळविले.
‘अंडा सेल’मधील एका कैद्याने परीक्षेनंतर प्रतिक्रिया दिली की, ‘गांधीजींच्या पुस्तकांतून सत्य आणि अहिंसेचे मूल्य समजले आणि माझ्या चुकांचीही जाणीव झाली. यापुढे कोणताही गुन्हा न करण्याची शपथ घेतली आहे.
या कैद्याने मागील वर्षी मुंबई सर्वोदय मंडळाला पत्र लिहून गांधीजींची पुस्तके वाचण्याची व गांधी परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सर्वोदय मंडळानेही त्यास ‘गांधीजींची आत्मकथा’ पाठविली होती. इतरही कैद्यांनी अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
मुंबई सर्वोदय मंडळ गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये गांधी शांती परीक्षेचे आयोजन करीत आहे. मंडळाला त्यांच्या या उपक्रमात तुरुंगातील कैदी व अधिकारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कैद्यांमध्ये पश्चात्तापाची भावना निर्माण करणे, त्यांना सत्य व अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे व कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून जीवन व्यतीत करण्यास सक्षम बनविणे, हा गांधी परीक्षेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ही गांधी परीक्षा मुंबई सर्वोदय मंडळातर्फे आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक भारत भोसले यांच्या सक्रिय मार्गदर्शनाने व वरिष्ठ कारागृह अधिकारी वाय.बी. बाविस्कर, जेलशिक्षक अंकुश ढेंगळे गुरुजी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. कैद्यांना गांधीजींच्या मूल्यांची ओळख करून देण्यासाठी, गांधीजींची आत्मकथा वाचून गुन्हे कबूल केलेल्या लक्ष्मण गोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Arthur Road Jail's 'Truth Experiment' in Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.