Join us  

मातंग, गारुडी आदी समाजांच्या कल्याणासाठी ‘आर्टी’; लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या नावाने संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 4:29 AM

या संस्थेमार्फत मातंग, गारुडी, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग म्हशी, मदारी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी, मदिगा या समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.

मुंबई : आमच्या कल्याणासाठी स्वतंत्र शासकीय संस्था स्थापन करा ही मातंग, गारुडी आदी समाजांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने मंगळवारी एक आदेश काढून अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना केली.

या संस्थेमार्फत मातंग, गारुडी, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग म्हशी, मदारी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी, मदिगा या समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.

राज्यातील अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी पुण्यात मुख्यालय असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आधीपासूनच कार्यरत आहे. मात्र, मातंग आदी समाजांच्या कल्याणासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याची मागणी अनेक संघटनांनी बऱ्याच वर्षांपासून लावून धरलेली होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. याच बरोबर अनुसूचित जातींची अबकड, अशी वर्गवारी करावी, या मागणीचा पाठपुरावादेखील अनेक वर्षांपासून केला जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या ११ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आर्टीच्या स्थापनेचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्या संबंधीचा शासन निर्णय (जीआर) मंगळवारी काढण्यात आला.

‘आर्टी’ची ठळक उद्दिष्टे अशी

विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या सामाजिक समतेचा अभ्यास करून मातंग समाजासाठी त्याचा उपयोग करणे.

सामाजिक समतेच्या प्रक्रियेत मातंग समाजाला सामावून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.

संस्थेचे समाज उन्नतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याच पद्धतीने कार्यरत संस्थांचे सहकार्य घेणे. अशा संस्थांना प्रोत्साहन देणे.

लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संशोधन यांचे प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धी देणे. परंपरागत व्यवसायांना चालना देणे.

शिक्षण, उच्चशिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्टार्ट अप, रोजगार निर्मिती यावर भर देणे.

समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.

संस्थेच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चासत्र, संमेलने, परिसंवाद आदी उपक्रम राबविणे.

प्रगतीच्या दृष्टीने विविध जाणिवांची निर्मिती समाजामध्ये करणे.