बाळा पडेलकरअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन
मुंबईत साजऱ्या होणाऱ्या सर्वच उत्सवांचे स्वरूप गेल्या दहा वर्षांत बदलले असून, या सर्व सण-उत्सवांना कॉर्पोरेट रूप आले आहे. दहीहंडीही यास अपवाद नाही. उलटपक्षी स्पॉन्सर्स, राजकीय नेत्यांच्या हंड्या, जाहिरात, प्रो-दहीहंडी आणि त्यातून विविध घटकांना मिळणाऱ्या आर्थिक स्रोतांमुळे गोविंदा ब्रॅण्डेड झाला आहे. हे सगळे होत असताना मैदाने नीट होत आहेत. गोविंदासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना बळकट होत आहेत. हंडीकडे खेळ म्हणून पाहिले जात आहे. यातून गोविंदा नावारूपाला येत आहेत. त्यामुळे गोविंदा ब्रॅण्डेड झाला व दहीहंडी कॉर्पोरेट झाली असे म्हटले तर वाईट नाही, अभिमान वाटला पाहिजे.
दोन हजार सालानंतर हंडीचे स्वरूप बदलत गेले. लालबाग-परळमधल्या हंड्या म्हणजे विशेष आकर्षण होत्या. डोंगरी, माझगाव हा परिसर म्हणजे जणूकाही हंडीचा बालेकिल्ला होता. माझगावमध्ये जागेवाल्याला नारळ दिल्यापासून शेवटची हंडी फोडण्यापर्यंतचा प्रवास मजेशीर होता. आजही आहे. हंडीचा टी शर्ट असो किंवा नसो, मराठी गाण्यांवर थिरकणारा गोविंदा जगाचे लक्ष वेधून घेत होता. आता बदल होत आहेत आणि ते मान्य करावे लागतात. चायनीज, पिझ्झा आपण खातोच की. बदल हे काळानुसार होत असतात. काळानुसार गोविंदा, गोविंदा पथकांचे स्वरूप बदलत गेले आहे. गरजेनुसार हे बदल होत गेले आहेत. यात काही चुकीचे नाही. आपण हे काही ठरवून केलेले नाही. किंवा मुद्दामहून हे झाले नाही. हा बदल घडत गेला आहे. पूर्वी गिरगाव, डोंगरीमध्ये दहीकाले निघत होते. चित्ररूपी दहीकाले निघत होते. सोबत हंडी बांधली जात होती.
जाहिरातदार आले. स्पॉन्सर्स आले. डीजेवाले आले. यातून अनेकांना रोजगार मिळाला. हे चांगलेच झाले. स्पॉन्सर्समुळे हंडीच्या रकमा वाढल्या. त्यामुळे पथकांना बक्षिसे मिळू लागली. मोठा आवाज करणारे डीजे आल्याने डीजेवाल्यांना पैसे मिळाले. डीजेच्या गाण्यावर थिरकणाऱ्यांना पैसे मिळाले. त्यातून प्रेक्षकांचे आणि गोविंदांचे मनोरंजन झाले. यात आजही उत्सव जपण्याचे काम केले जात आहे. आता गोविंदावर टीका होत असेल तर मनावर घ्यावे का, हा प्रश्न आहे. कारण गोविंदा काळानुसार बदलत आहे. कोणी ठरवून हे केले नाही. पूर्वी चार थराच्या हंड्या फुटायच्या. नंतर थर वाढत गेले. ज्यांना काही कळत नाही असे लोक रकमेवर बोलतात. पण यात मुलांचे कौशल्य आहे. मुलांचा सराव आहे. व्यायाम आहे. शिस्त आहे. आपण ज्या टप्प्यावर आहोत ते शिस्तीमुळे आहे. एका मिनिटांत हे झाले नाही. चार थरांचे सात थर होण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. एक थर वाढविण्यासाठी सरासरी दहा वर्षांचा वेळ लागतो. यासाठी मंडळांनी सराव केला आहे. आज थरावर थर रचले जात आहेत हे आपल्या प्रो गोविंदाने दाखवून दिले आहे. पूर्वी चार थरातही खूप दुखापती होत होत्या. आज त्या मानाने दुखापती कमी होत आहेत. आता उपचार चांगले होत आहेत. व्हीआयपी उपचार दिले जात आहेत. एका मिनिटांत हे झालेले नाही. हा प्रवास मोठा आहे. मुलांची मेहनत, चिकाटी आहे.