तुम्ही मृत्युपंथाला लागला आहात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:15 AM2019-07-26T02:15:41+5:302019-07-26T02:16:04+5:30
२६ जुलैच्या महापुरात सर्वत्र महापुराचे पाणी साचले. ही घटना घडल्यानंतर अनेकदा समुद्रात भराव करू नका.
गिरीश राऊत
२६ जुलै २००५ च्या दुर्घटनेला १४ वर्षे पूर्ण होत असून, एवढ्या वर्षांत पुराचे संकट कमी व्हावे, मिठी नदीच्या पाण्याचा वेग वाढावा, मिठी नदीच्या पात्रातील अनधिकृत बांधकामे काढण्यात यावीत, बुजविण्यात येत असलेली माहिमची खाडी पुन्हा मोकळी करावी; असे बरेच काही करणे गरजेचे होते. मात्र आपण काहीच केले नाही. उलटपक्षी आपण वांद्रे-वरळीसारखा सी-लिंक उभा केला. कोस्टल रोडसारखा प्रकल्प उभा करीत आहोत. महत्त्वाचे म्हणजे हे करण्यापेक्षा बुजविलेला समुद्र मोकळा करण्यासह मिठी नदीला मोकळा श्वास घेऊ देणे गरजेचे होते. प्रत्यक्षात आपण हे केले नाही, तर याउलट कार्य करीत २६ जुलैच्या दुर्घटनेतून आपण काहीच धडा घेतलेला नाही.
२६ जुलैच्या महापुरात सर्वत्र महापुराचे पाणी साचले. ही घटना घडल्यानंतर अनेकदा समुद्रात भराव करू नका. समुद्रात सुरू असलेले प्रकल्प थांबवा. मिठीलगत बांधकामे करू नका. मिठी नदीच्या किनारी भिंत बांधू नका. वांद्रे-कुर्ला संकुलात ज्याप्रमाणे मिठी नदी बुजविण्यात आली त्याप्रमाणे प्रकल्प उभे करू नका. कारण अशा प्रकल्पांमुळे जमिनीची पाणी शोषूण घेण्याची क्षमता कमी होते. परिणामी, पुराचे संकट ओढवते. २६ जुलैची घटना ही केवळ मिठी नदी किंवा समुद्रातील बांधकामे या एका विषयाभोवती फिरत नाही, तर तिच्याशी प्रत्येक घटकाचा संबंध आहे.
मोटारीकरणामुळे होणारे रस्ते, प्रत्यक्ष मोटार बनवण्यासाठी खाणकाम व इतर गोष्टी यासह मोटार चालवताना होणाऱ्या उत्सर्जनाचा एकत्र विचार केला तर या वायूच्या पृथ्वीवरील सुमारे ७५ टक्के उत्सर्जनास मोटार व पर्यायाने रिफायनरी जबाबदार आहे. मोटारीचे अनेकांगी दुष्परिणाम दाखवणाºया जर्मनीतील संशोधनाने हे स्पष्ट केले आहे की मोटार हे पृथ्वीसाठी अरिष्ट आहे. एक अपघातच घ्या. दरवर्षी रस्ते अपघातांत होणाºया सुमारे साडेचार लाख मृत्यूंना प्रामुख्याने मोटारीकरण जबाबदार आहे. या प्रत्येक घटकाचा २६ जुलैशी संबंध आहे. विकासाच्या नावाने एवढे डोंगर व त्यावरचे जंगल तोडता. बांधकामे, रस्ते करता. मग पाऊस नाही, नदी वाहत नाही, भूजल नाही, विहिरी-तळ्यांना पाणी नाही म्हणून निसर्गालाच दोष देता? भूआवरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यापैकी एक तरी आवरण तुम्ही धड शिल्लक ठेवले आहे का? कोट्यवधी वर्षे निसर्गाने तुम्हाला सर्व दिले. मग आत्ताच ही परिस्थिती का? याचा साधा अर्थ तुम्हाला समजत नाही. या विकासाने देश व पृथ्वी प्रत्येक दिवशी उजाड होत चालली आहे आणि तुम्ही, आम्हाला जगवायला उद्योग आणा, असे म्हणता. ज्यामुळे तुम्ही मृत्युपंथाला लागला आहात त्यालाच आमंत्रण देत आहात. आता थांबलो नाही, तर येत्या तीन-पाच वर्षांत नागपूरसह विदर्भ-मराठवाडा निर्मनुष्य करावा लागेल. याकडे दुर्लक्ष करू नये. अतिवृष्टी व मुंबईचे बुडणे मी अचूक सांगितले होते व आंदोलन घडवून सी-लिंक प्रकल्पाचा भराव मच्छीमार व इतर नागरिकांसह आंदोलनाद्वारे थांबवून, माहिमचा सागर पूर्ण बुजवू दिला नाही. म्हणून लाखो माणसांचे प्राण व मुंबई, २६ जुलै २००५ ला अधिक भयंकर प्रलयापासून वाचली. हे माझ्या कौतुकासाठी नाही, तर मुद्दा तुमच्या लक्षात यावा म्हणून सांगितले.
(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)