दादर-माहीममध्ये कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 02:02 AM2020-08-16T02:02:42+5:302020-08-16T02:02:53+5:30
दादर-माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी परिमंडळ २चे पालिकेचे सहआयुक्त नरेंद्र बर्डे आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समुद्र्र चौपाटीवर गर्दी टळावी यांसाठी दादर-माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती, तिला महापालिकेने संमती दर्शविली आहे. गणेशोत्सव काळात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी आहे ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी परिमंडळ २चे पालिकेचे सहआयुक्त नरेंद्र बर्डे आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दादर-माहीम परिसरात गणेश विसर्जनांसाठी कृत्रिम तलावांसाठी मनसेने जागा सुचविल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादर-माहीम परिसरात ७ ठिकाणी कृत्रिम
तलावांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
शिवाजी पार्क येथील महानगरपालिका क्रीडा भवन, मृदुंगाचार्य मैदान, रमा गावंडे मैदान, जाखादेवी मंदिर भूखंड-दादर, अँटोनिया शाळेचे पटांगण, एस. के. बोले रोड येथील चौधरीवाडी मैदान, प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदान व धारावीत तीन या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.
>के पश्चिम वॉर्डमध्ये मूर्तिदान योजना
मुंबई :यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गणपती विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी के पश्चिम वॉर्डमध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असून मूर्तिदान योजनेद्वारे गणेशभक्तांच्या मूर्ती विसर्जनासाठी स्वीकारण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रही विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त मोटे यांनी ‘लोकमत’ला दिली.के पश्चिम वॉर्ड कोणत्या विविध उपाययोजना राबवणार याचे परिपत्रक त्यांनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेश उत्सव साजरा करणाया गणेशभक्तांसाठी जारी केले आहे. के पश्चिम वॉर्डमध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाकरता महापालिकेच्या वाहन व्यवस्थेमार्फत विधिवत विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी विविध मंडपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच शक्य असल्यास गणेशमूर्ती या नजीकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जमा केल्यास महापालिकेतर्फे विसर्जनस्थळी नेण्यात येतील. गणेशभक्तांनी त्यांच्या घरीच गणेशमूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून मग महापालिकेच्या व गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़
>गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रीगणेशासाठी प्रत्येक गोष्ट तयार असावी यासाठी मुंबईकरांची लगबग सुरु आहे. तत्पूर्वी मुंबईतल्या गणेशचित्र कार्यशाळेत तयार होत असलेल्या गणेशमूर्तींवर अखेरचे रंगकाम केले जात आहे. श्रीगणेशाला फेटे, धोतर नेसविले जात आहे.
श्रीगणेशाची मूर्ती अधिकाधिक रेखीव आणि सुबक केली जात आहे. कुर्ला येथील वरद विनायक आटर््स येथील गणेशचित्र कार्यशाळेतही आता
श्रीगणेशमूर्तीवर अखेरचे रंगकाम केले जात आहे. मूर्तीवर आभूषणे जडवली जात आहेत.
रत्न, हिऱ्यांनी मूर्ती आणखी रेखीव आणि सुबक केली जात आहे. हिऱ्यांनी सजलेली मूर्ती आणखीच आकर्षक दिसत असून, आता येत्या काही दिवसांत मुंबईकरांच्या घरी गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात विराजमान होणार आहेत.