मुंबई : प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी कंपन्यांना साद घातली असून, दोन विदेशी कंपन्यांसह चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आधी चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, दोन विदेशी कंपन्या इच्छुक असून तसा मेल पालिका प्रशासनाला केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
यामध्ये ३ कंपनी बंगळुरु, एक कंपनी रायगड आणि एक कंपनी कर्नाटक राज्यातील आहे. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुबईस्थित कंपनीशी चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिरूची मागवण्यात आल्या होत्या.
या प्रयोगासाठी खर्च किती?
या एका प्रयोगासाठी एकावेळी ४० ते ५० लाख रुपये अशी ढोबळ अंदाजित रक्कम आहे. ही रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे हा प्रयोग करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
या प्रयोगामुळे पाऊस पडला तर पुढचे किमान सात-आठ दिवस हवेचा दर्जा चांगला राहील. त्यामुळे दररोज प्रयोग करावा लागणार नाही. तर आठ दहा दिवसांनी त्याची गरज भासेल.
निविदेत तशा अटी समाविष्ट करण्यात येणार असून त्यामुळे खर्चावर नियंत्रणही राहील, असा दावा सध्या केला जात आहे.
तंत्रज्ञान निश्चित करणार :
हवेत धुळीचे कण, प्रदूषण थांबून राहत असल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेतले जाणार आहे. यानंतर पात्र ठरणारे तंत्रज्ञान निश्चित झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार असून अंमलबजावणी केली जाणार आहेत.
यामध्ये ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ १०० पर्यंत असल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची गजर पडणार नाही. या साठी संस्थेची निवड करताना कंपन्यांची वार्षिक उलाढाल किती, कंपनीने कुठे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले, किती यशस्वी झाले त्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर निविदा काढून तीन वर्षांसाठी करार केला जाणार आहे.