दुरु स्तीच्या नावाने कृत्रिम पाणीटंचाई
By admin | Published: April 5, 2015 10:35 PM2015-04-05T22:35:04+5:302015-04-05T22:35:04+5:30
तालुक्यातील नेवरूळ गावात शासनाच्या नळ पाणीपुरवठा भारत निर्माण स्वजलधारा योजनेअंतर्गत २0१३-१४ ला अंदाजे २३ लाखांची योजना मंजूर करण्यात आली.
म्हसळा : तालुक्यातील नेवरूळ गावात शासनाच्या नळ पाणीपुरवठा भारत निर्माण स्वजलधारा योजनेअंतर्गत २0१३-१४ ला अंदाजे २३ लाखांची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे काम ग्रामस्थांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. २0१४ ला नळ पाणी पुरवठा योजना नेवरूळ ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली, पण सदर योजनेला फक्त एक दीड वर्ष उलटले असताना जाणीवपूर्वक भर उन्हाळ्यात पाइपलाइन दुरुस्तीला काढून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम सध्या म्हसळ्यात सुरू आहे.
२0१३- १४ मध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्र ार नेवरूळ येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या योजनेची चौकशी होऊन योजनेत दोषही आढळले असताना दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही. विद्यमान पाणीपुरवठा कमिटीकडून पाणीपट्टीचा हिशोब व डिपॉझिट पावत्या अद्याप दिल्या नसल्याचे समजते. या योजनेची १५ वर्षे शाश्वती असताना योजना नादुरु स्त दाखवून कोणतीही परवानगी, दुरुस्तीबाबत पत्र व दाखला नसताना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता खाजगी संस्थेमार्फत चाललेल्या दुरुस्तीबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
योजनेसाठी प्रत्येक घरटी पैसे देखील काढण्यात आले आहेत. या व्यवहाराला जबाबदार कोण? पाणीपुरवठा कमिटी अध्यक्षांनी या योजनेचे काम सुरु केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पंचायत समितीचे अधिकारी व पुरवठा विभागाचे उप अभियंता हे जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ग्रामस्थांना त्रास देत असल्याचा आरोप होत आहे.
ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावात पाणी नियमित न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)