‘माझा’ पुरस्काराच्या ‘वर्षा’वात कलावंत चिंब...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:30+5:302021-07-09T04:06:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी नाट्यसृष्टीतील अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी नाट्यसृष्टीतील अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी १२ वर्षांपूर्वी ‘माझा पुरस्कार’ची मुहूर्तमेढ रोवली. रोखठोक स्वाभिमान बाळगत अशा पद्धतीचा पुरस्कार, ‘आले स्वतःच्या मना’ या तत्त्वावर देणारे अशोक मुळ्ये यांनी यंदाचा ‘माझा पुरस्कार’ देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानच गाठले. या अपूर्व योगाने ‘माझा’ पुरस्कार प्राप्त झालेले कलावंत तर अक्षरशः ‘वर्षा’वात चिंब झाले.
अशोक मुळ्ये यांनी यंदा या पुरस्कारांसाठी दूरचित्रवाणीवरील हास्यजत्रेच्या कलावंताची निवड केली आणि हा पुरस्कार सोहळा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घडवून आणला. सदैव पांढऱ्या कपड्यात वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नाट्यगृहांवर उठून दिसणाऱ्या अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील हा सोहळा मात्र रंगतदार ठरला. स्पष्टवक्तेपणाचे मूर्तिमंत उदाहरण नाट्यसृष्टीत कायम केलेले अशोक मुळ्ये हे स्वतःचा असा हा पुरस्कार कलावंत मंडळींना सातत्याने देत आले आहेत.
यंदा लेखक सचिन मोटे, निर्माता व दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक व अभिनेता समीर चौघुले, अभिनेता प्रसाद खांडेकर व गौरव मोरे, अभिनेत्री विशाखा सुभेदार व नम्रता संभेराव यांना या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझा’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रसाद ओक, प्राजक्ता माळी, वनिता खरात, पंढरीनाथ कांबळे, अमित फाळके, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, ओंकार भोजने, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, आदी कलावंत यावेळी उपस्थित होते.
चौकट:-
सातत्याने हसविणे हे कठीण काम
विनोदनिर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे काम हास्यजत्राची टीम करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार प्रदान सोहळ्यात या कलाकारांचे कौतुक केले.
सोबत: फोटो
फोटो कॅप्शन:-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘माझा’ पुरस्कार प्रसाद खांडेकर यांनी स्वीकारला. यावेळी अशोक मुळ्ये उपस्थित होते.