हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी, ठाणे : पैसे मिळतात म्हणून कलाकार कोणाचाही प्रचार कसा करू शकतात? त्यांना तात्त्विक, वैचारिक भूमिका असायलाच हवी, अशी भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी मांडली. आमचे समाजाशी, राजकारणाशी देणेघेणे नाही, असे सांगणे हा भोंदूपणा आहे. कारण, तुम्ही जरी पैसे घेऊन एखाद्या उमेदवाराचा प्रचार केलेला असला, तरी लोकांनी तुमचा चेहरा पाहून त्यांना मतदान केलेले असते. त्यामुळे त्याची जबाबदारी तुमच्यावर येते, अशी सडेतोड भूमिका त्यांनी संमेलनातील मुलाखतीदरम्यान मांडली.सगळेच जरी भारतमातेचे सुपुत्र असले तरी कलावंताला जात, धर्म कसा नसेल? एकाच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही वडिलांसारखे कसे असतील? अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी भूमिका न घेणाऱ्या कलावंतांवर शरसंधान केले. नाटक हा व्यवसाय आहे, असे जरी सांगितले जात असले तरी निर्माते गोळा करत असलेले पैसेवगळता त्यात व्यवसायासारखे काहीही नाही. लांबच्या प्रवासात गाडीवर दोन ड्रायव्हर हवेत, याकडेही लक्ष पुरवले जात नाही, परवडत नाही, असे सांगितले जाते. मग, एखाद्या गाडीला अपघात झाला की, तेवढ्यापुरती चर्चा होते. नंतर, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी उदाहरणे देत पोंक्षे यांनी या व्यवसायातील विसंगतींवर बोट ठेवले. ज्येष्ठ कलावंतांना आधार देणे, आकस्मिक निधन झालेल्या कलाकारांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत करणे, त्यासाठी पैसे गोळा करणे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एखादा कलाकार मरण पावल्यावर वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर गळे काढणारे पैसे उभे करताना कसा हात आखडता घेतात, हे सांगताना त्यांनी आनंद अभ्यंकर यांच्या निधनानंतरचा प्रसंग सांगितला. नाटक ही सांघिक कला आहे. कोणत्याही कलावंताने आधी काही वर्षे रंगभूमीवर काम करावे. थेट स्क्रीनवर येऊच नये. कारण, थेट पडद्यावर आल्याने त्यांना अभिनयातले काही कळत नाही आणि त्यांचे चेहरे हलत नाहीत म्हणून कॅमेरा हलवावा लागतो. कलावंतांच्या अभिनयात दम नसेल, तर मग हवे तसे करार केले जातात. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली १६ तास पिळवणूक होते. तुमच्या अभिनयात दम असेल तर मग तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टला, पिळवणुकीला ठाम नकार देऊ शकता, असे त्यांनी स्पष्ट केले. हल्ली मालिकेत तुकड्यातुकड्याने काम होते. त्यामुळे अभिनयातला जिवंतपणा, लय, एकसंधता यातील कशाचाच आनंद प्रेक्षकांना मिळत नाही, यावरही त्यांनी बोट ठेवले. मोठा नट व्हायचे असेल तर डोळे-कान उघडे ठेवा, असा त्यांना एका ज्येष्ठ कलाकाराने दिलेला सल्लाच त्यांनी पुढील पिढीला दिला. मी आयुष्यात कधीही गांधीजींची भूमिका करू शकत नाही. कारण, कोणत्याच अँगलने मी तसा दिसत नाही, असा खुलासा त्यांनी केला. नटसम्राट करायचे आहे!सध्या मी ‘पुरुष’ नाटक करतोय. ते एप्रिलमध्ये रंगमंचावर येईल, असा तपशील पोंक्षे यांनी पुरविला. मला नटसम्राट करायचे आहे, असे सांगताना त्यांनी अनेकांनी ही भूमिका केल्याचा संदर्भ दिला खरा, पण कोणीही हे नाटक करतो. त्याला काही अर्थ राहिलेला नाही, अशी तिरकस टीकाही केली.
कलावंताला वैचारिक भूमिका असावीच
By admin | Published: February 22, 2016 12:37 AM