साधेपणातील कलात्मक सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:25+5:302021-09-19T04:06:25+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गणेशभक्तांच्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पांची विविध वैशिष्ट्ये असतात. कुणाच्या मूर्तीमध्ये नाविन्य ...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशभक्तांच्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पांची विविध वैशिष्ट्ये असतात. कुणाच्या मूर्तीमध्ये नाविन्य असते; तर कुणी सजावटीत वेगळेपण जपतात. मात्र, दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती स्थानापन्न होत असतो. हा बाप्पा पाटील परिवाराच्या घरातला असून, तब्बल सहा पिढ्यांचा इतिहास या गणपतीला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गणपतीला संपूर्ण कलात्मक सागवानी साज असतो. हा बाप्पा, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत, असा दहा दिवस पाटील परिवाराच्या घरी मुक्कामाला असतो.
पाटील परिवारात एकत्र कुटुंबपद्धती असल्याने, त्यांच्या बाप्पाच्या सेवेसाठी अनेकजण जातीने हजर असतात. या परिवारातील सुशील पाटील याबाबत सांगतात की, आमच्या आजोबांच्या लहानपणी, म्हणजे १८००च्या काळात त्यांनी घरी गणपती आणण्यासाठी हट्ट केला. आजोबांच्या मामांना मूलबाळ नसल्याने त्यांनी गणपती हौसेने त्यांच्याकडे आणला. तो इथेच स्थानापन्न झाला. माझ्या पाचव्या पिढीसह, आता घरातल्या सहाव्या पिढीनेही या गणपतीच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.
या गणपतीचे जे मोठे सागवानी टेबल आहे; त्याला पूर्वीच्या भाषेत ‘बाज’ म्हणायचे. ते बाज आमच्या आजोबांनी १९००च्या काळात घडवलेले आहे. बाजचा टॉप एका झाडाचा, एका लाडकाचा एकसंध असा आहे. त्याला कुठेही जोडकाम केलेले नाही. असा ‘पीस’ आता कुठे मिळणे सहजशक्य नाही. तो बर्मा सागापासून बनवलेला आहे. या बाजसाठी कुठेही लोखंडी खिळा वापरला गेलेला नाही. त्यासाठी शिसवी लाकडाचे खिळे बनवून वापरले आहेत, अशी वैशिष्ट्यपूर्ण माहितीही सुशील पाटील देतात.
गणपतीच्या चौरंगाला दीडशे वर्ष
या गणपतीसाठी असलेला चौरंग दीडशे वर्षांपासूनचा आहे. पाटील यांचे पणजोबा जगन्नाथ पाटील यांनी तो घडवलेला आहे. चौरंगाचे पाय सिंहाच्या पायांसारखे आहेत. त्याचे पॉलिश तेव्हाचेच आहे. आतापर्यंत कधीही त्याला नव्याने पॉलिश केले गेलेले नाही. हे सगळे सामान फोल्ड करुन पेटीत ठेवले जाते आणि वर्षातून फक्त गणेशोत्सवाच्या दिवसांत हे सामान बाहेर काढले जाते. या गणपतीच्या सभोवती असलेले दिवेसुद्धा जुन्या काळातले आहेत. यातील काही दिवे परदेशी आहेत. तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्याने, असे परदेशी दिवे मिळत असत. ते दिवे पाटील परिवाराने अजूनही जपून ठेवले आहेत.
(ऑपरेटर नोंद : बायलाईन देणे).
सोबत : फोटो.