मुंबई- मुंबईतील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, शहर उपनगरातील सण उत्सव, माणुसकीचे दर्शन, कष्टकरी - चाकरमानी अशा विविध वर्गातील भाव भावना आपल्या छायाचित्रातून द लीगसी प्रदर्शनात उलगडले आहे. छायाचित्रकार मुकेश पारपियानी यांचे द लिगसी हे छायाचित्र प्रदर्शन १७ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी, टेरेस गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
मुकेश पारपियानी हे मुंबईस्थित फोटो जर्नालिस्ट आहेत. अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांसाठी त्यांनी छायाचित्रकार तसेच फोटो एडिटर म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. या संस्थांसाठी काम करताना त्यांचा दीर्घ अनुभव पाहून त्यांना निवृत्तीनंतर पिरामल आर्ट गॅलरीचे प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून कष्टकरी गरीब लहान मुलांचे भावविश्व दर्शविताना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन निमित्ताने त्यांच्या हातातील छोटे तिरंगी झेंडे व ते कोणीतरी खरेदी केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद कॅमेऱ्यात कैद केला आहे. सामान्य जणांना लष्करी जवान व त्यांचे जीवन या संबंधी असणारी उत्सुकता व ते प्रत्यक्ष समोर असल्यावर त्यांच्या मनात होणारी चलबिचल, लहान मुलांना असणारे लष्करी जवान आणि त्यांची शस्त्रे या ठिकाणी छायाचित्र स्वरूपात दिसतील. ऐन पावसाळ्यात ऐतिहासिक वास्तू आणि परंपरा जपणाऱ्या इमारतींचे जलमय वातावरणातील प्रकटीकरण छायाप्रकाशाच्या व सावल्यांचा माध्यमातून वैशिष्टयपूर्ण शैलीत सर्वांना येथे दर्शन घडवले आहे. त्याप्रमाणे येथील सांस्कृतिक जीवनातील विविध घडामोडींचे एक भावपूर्ण दर्शन त्यांनी या प्रदर्शनातून कला रसिकांना घडवले आहे.
मुकेश पारपियानी यांनी अमिताभ बच्चन, शरद पवार, बॅ. अंतुले शहनाई नवाझ उस्ताद बिस्मिल्ला खान, अरुण गवळी वगैरेंचे त्यांनी केलेले भावपूर्ण सादरीकरण सर्वसामान्य लोकांना भावले आणि त्यांची प्रशंसा मिळवली. तसेच जनसामान्यांना भावणारे विषय जसे गणपती विसर्जन व ती मूर्ती विसर्जन करताना घेतली जाणारी गणेश मूर्तीची विशेष काळजी, सिद्धिविनायक चरणी अमिताभ बच्चन यांचे नतमस्तक होणे वगैरेंचे दर्शन त्यांनी घडविले. तसेच नववधूची सासरी पाठवणी करीत असताना तिच्या मनातील भावकल्लोळ व संमिश्र भावना अशा तऱ्हेने विविध विषयांचे प्रकटीकरण त्यांनी मनोविश्लषणात्मक दृष्टिकोनातून आपल्या छायचित्रांच्या माध्यमातून केले आहे.