कलाकारांनो, वर्षाला १ हजार द्या, वृद्धापकाळात मदत होईल!, संघाच्या निधीसाठी साद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:44 AM2019-11-30T01:44:36+5:302019-11-30T01:45:01+5:30

समस्त मराठी कलावंतांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी किमान एक हजार रुपये जरी मराठी नाट्य कलाकार संघाकडे जमा केले, तरी कित्येक लाखांचा निधी निर्माण होऊ शकेल.

Artists, pay 3,000 a year, help in old age | कलाकारांनो, वर्षाला १ हजार द्या, वृद्धापकाळात मदत होईल!, संघाच्या निधीसाठी साद

कलाकारांनो, वर्षाला १ हजार द्या, वृद्धापकाळात मदत होईल!, संघाच्या निधीसाठी साद

Next

- राज चिंचणकर

मुंबई : समस्त मराठी कलावंतांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी किमान एक हजार रुपये जरी मराठी नाट्य कलाकार संघाकडे जमा केले, तरी कित्येक लाखांचा निधी निर्माण होऊ शकेल. भविष्यात जर का कुणी कलाकार आजारी पडला, तर त्याला विनाविलंब किमान पन्नास हजारांची तरी मदत त्यातून देता येऊ शकेल, अशी भूमिका मराठी नाट्य कलाकार संघातर्फे जाहीरपणे मांडण्यात आली आहे. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळ्याच्या व्यासपीठावरून मराठी कलाकारांना ही साद घालण्यात आली आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यंदाही मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर हा ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कलाकार संघाचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांनी व्यासपीठावरून संवाद साधताना, सर्व कलावंतांनी कलाकार संघाला प्रतिवर्षी प्रत्येकी एक हजार रुपये द्यावेत हे आवाहन करण्यासाठीच मी येथे आलो आहे, असे सडेतोडपणे स्पष्ट केले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांत कलाकारांसाठी राखीव कोटा कलाकार संघाने उपलब्ध करून दिला आहे. कलाकार संघाच्या वतीने विमा योजनासुद्धा राबविण्यात येते. २५० रुपयांत १० लाखांचा आणि ३५० रुपयांत २५ लाखांचा कलाकारांचा विमा उतरविण्यात येतो. खूप कामे अजूनही करायची आहेत, पण त्यासाठी कलाकारांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही, अशा शब्दांत कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी यावेळी खेद व्यक्त केला.

ज्या रंगकर्मींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे, अशा २५ निवडक रंगकर्मींचा सन्मान या सोहळ्यात युवा कलाकारांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर, विलास गुर्जर, गंगाराम गवाणकर, आनंदा नांदोस्कर, सुनीता गोरे अशा रंगकर्मींचा यात समावेश होता. या निमित्ताने ‘अवघे पाऊणशे वयमान’ असलेले रंगकर्मी व्यासपीठावर एकत्र येण्याचा योग जुळून आला.

माहिमच्या यशवंत नाट्यगृहात रंगलेल्या या सोहळ्याचे सन्मानमूर्ती होण्याचा मान यंदा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना मिळाला. त्यांच्या कारकिर्दीला सलाम म्हणून, त्यांच्या ‘हसवाफसवी’ या नाटकातील काही प्रवेश पुष्कर श्रोत्री, विजय पटवर्धन, योगिता पोफळे या कलाकारांनी सादर केले. विघ्नेश जोशी यांनी या वेळी दिलीप प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला.

कलावंतांचा झेंडा; राजकारण्यांना प्रवेश नाही

मी आणि सुशांत शेलार एका राजकीय पक्षाचे आहोत. मात्र, या व्यासपीठावर आम्ही राजकारणी म्हणून नव्हे; तर केवळ कलावंत म्हणून येतो. फक्त कलाकारांचाच झेंडा आमच्या हातात असतो. एकाही राजकारणी व्यक्तीला आम्ही या व्यासपीठावर प्रवेश देत नाही, असे शरद पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पोंक्षे आणि सुशांत शेलार हे एका पक्षासाठी काम करतात, त्यांच्या हातात भगवा आहे. मीसुद्धा एका पक्षासाठी कार्यरत आहे; माझ्या हातात पिवळा झेंडा आहे. भगवा आणि पिवळा हे दोन्ही झेंडे बाजूला ठेवून, आम्ही तिरंगा घेऊन या व्यासपीठावर येत असतो. कुठल्याही राजकीय व्यक्तीला या व्यासपीठावर निमंत्रित करायचे नाही, असे आम्ही पहिल्यापासूनच ठरविले आहे; अशी भूमिका कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी यावेळी मांडली.

Web Title: Artists, pay 3,000 a year, help in old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई