Join us

कलाकारांच्या वटपौर्णिमेला समाजमाध्यमांवर बहर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागा गुंडाळून परंपरा जपत गुरुवारी महिलांनी वटसावित्रीचे व्रत पार पाडले; तर कलाकार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागा गुंडाळून परंपरा जपत गुरुवारी महिलांनी वटसावित्रीचे व्रत पार पाडले; तर कलाकार मंडळींनी समाजमाध्यमांचा आधार घेत वटपौर्णिमेचा आनंद लुटला. काही अभिनेत्रींनी पारंपरिक पेहराव परिधान करत आपली छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल केली. नऊवारी साडी आणि विविध आभूषणांनी नटलेल्या या अभिनेत्रींच्या पोस्ट्सना त्यांच्या चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला.

काही अभिनेत्रींनी वटपौर्णिमेच्या दिवशी दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मालिकांमधील वटपौर्णिमेच्या विशेष भागांचे प्रोमो समाजमाध्यमांवर व्हायरल केले.

शूटिंगच्या गडबडीत अनेकींना वास्तवात वटपौर्णिमा साजरी करता आली नसली, तरी त्यांनी त्यांची वटपौर्णिमा छोट्या पडद्यावर साजरी करण्यात आनंद मानला. तर, ‘सप्तपदींच्या सात फेऱ्यांनी बांधलेले हे प्रेमाचे बंधन, जन्मोजन्मी राहो असेच कायम, कोणाचीही लागो ना नजर या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम,’ असे म्हणत अभिनेत्री जुई गडकरी हिने समाजमाध्यमावर वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

वटपौर्णिमेचे पारंपरिक व्रत महिलावर्ग करीत असतो. मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी काही पुरुष कलाकारांनीही त्यांच्या संवेदनशील भावना समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या. ‘तो पिंपळ जरा बोलघेवडा, तो वड बिचारा मुकावेडा; कसल्याशा वेदनेने वड मुक्यानेच रडतो, आपण त्याच्या अश्रूंचे झोपाळे बांधतो,’ अशा शब्दांत लेखक व दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी सामाजिक व पर्यावरणविषयक जागृती करत समाजमाध्यमावर लेखनप्रपंच मांडला. आ‘वड’ आहे; तर स‘वड’ मिळतेच, अशी खास पोस्ट समाजमाध्यमावर टाकत व रुजवलेल्या वटवृक्षाचे छायाचित्र व्हायरल करत, अक्षरसुलेखनकार सिद्धेश नेरुरकर यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधत पर्यावरणपूरक संदेश दिला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------