कलाकाराला कलेतून बदल अपेक्षित - साठे
By admin | Published: December 26, 2015 01:54 AM2015-12-26T01:54:08+5:302015-12-26T01:54:08+5:30
‘प्रत्येक कलाकार मग तो लेखक असो वा अन्य क्षेत्रातील त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून त्याला बदल अपेक्षित असतो आणि त्यासाठी तो सतत कलाकृतींची निर्मिती करतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक
मुंबई : ‘प्रत्येक कलाकार मग तो लेखक असो वा अन्य क्षेत्रातील त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून त्याला बदल अपेक्षित असतो आणि त्यासाठी तो सतत कलाकृतींची निर्मिती करतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, समीक्षक मकरंद साठे यांनी केले.
दादर येथील कीर्ती महाविद्यालयात ग्रंथालीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४१व्या वाचकदिनी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रंथाली प्रकाशित विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन मकरंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यात ‘शब्दारण्य’, ‘पडझड वाऱ्याच्या भिंतीची’, ‘जगा वेगळे’, ‘आफ्रिकी आतशबाजी’, ‘जिहाद’, ‘मनगट दणकट’, ‘छातीत हिंमत’, ‘छांदस’, ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकांचा समावेश होता. साठे यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांचा ‘लेखक’ प्रवास उलगडला. आणि अनेक किस्से वाचकांना सांगितले.
सद्य:स्थितीत अभ्यासपूर्व लिहिणारे लेखक कमी झाले आहेत, अशी खंतही या वेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच याप्रसंगी ‘अॅप’ली ग्रंथाली या अॅपचे आणि १२५ पुस्तके सामावलेल्या टॅबचेही उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लेखक नीरजा, श्रीकांत देशमुख, स्मिता भागवत, सुष्मा शाळीग्राम, राम पंडित, सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते, संजीवनी खेर, सदानंद डबीर, किशोर आरस आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर उपस्थित होते.
‘अॅप’ली ग्रंथाली
अॅण्ड्राईड फोनचे महत्त्व लक्षात घेत तरुणांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालीने ‘अॅप’ली ग्रंथाली नावाचे अॅप आणले आहे. हे अॅप गुगल स्टोरमधून मोफत डाऊनलोड करता येणार असून, यावर अनेक पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.