मुंबई - कलेच्या विभिन्न भूमिकांपैकी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे जनजागृती. मुंबईत सध्या चालू असलेल्या काळा घोडा फेस्टिव्हल मध्ये कलाकारांकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी समोर असलेल्या परंतु लक्षात न येणार्या अनेक समस्यांवर कलाकृती साकारलेल्या दिसतात.
नंदा दास आणि सुखदा दास या दाम्पत्याने त्यांच्या मॅक्सिमम मुंबई या इन्स्टॉलेशन मध्ये पुन्हा एकदा मुंबईच्या हरवत चाललेल्या आकाशाबद्दलचे विचार कालाकृतीद्वारे साकार केले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या धावत्या जीवनसरणीत शहरी माणसांचे जगणेच राहून जाते. उंच उंच इमारतींनी आकाश ग्रासले आणि उंच पदाच्या चढाओढीने माणसाने स्वतःला हरवले आहे. मुंबईत हरवत चाललेले आकाश याविषयावर स्वप्नांच्या भूलभुलैयात आपण कुठे जातोय याचा शोध घेण्याचा प्रयत्न नंदा दास आणि सुखदा दास या दाम्पत्याने घेतला आहे.
उंच उंच इमारतींनी आकाश ग्रासले आहे. समुद्राने जमिनीचा घास घेऊ नये म्हणून आपण मरीन ड्राईव्हवर टेट्रापॉडची पंगत सजवली. परंतु आता हळूहळू या टेट्रापॉडज्ना वेळ आली आहे ती वाढत्या इमारतींवर चढून त्यांना आळा घालण्याची. वेळ आली आहे ती लोखंडाच्या उभ्या आडव्या रेघांनी व्यापलेल्या आकाशाला अजून न ओरबाडता त्याला सांभाळण्याची. नाहीतर मुंबईच्या आकाशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. नाहीतर कालांतराने मान वर केली तर तळहाता इतकही आकाश नजरेला सापडणार नाही. १२ फेब्रुवारीपर्यंत चालू असलेल्या या काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचा भाग असलेल्या क्रॉस मैदानावरील नंदा आणि सुखदा दास यांच्या ' मॅक्सिमम मुंबई ' या इन्स्टॉलेशनला अवश्य भेट द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.