मुंबई : प्राचीन काळातील गुरू आणि शिष्याचा संवाद म्हणजे ‘उपनिषदे’ ही संज्ञा आहे. या उपनिषदांमागील भूमिका, त्यातील तत्त्वज्ञान आजच्या काळातील विचारसरणीसाठी उपयुक्त आहे. या उपनिषदांमध्ये असणाºया गूढ चिंतनाचा शोध घेणारे अनोखे प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस येत आहे. प्राचीन काळात लिहिलेल्या या उपनिषदांवर आधारित कलाकृती रेखाटण्याचा विचार ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी प्रत्यक्षात साकारला आहे.‘उपनिषत्सु’ हे या कलाप्रदर्शनाचे शीर्षक असून, ६ ते १२ फेब्रुवारीदरम्यान कुलाबा काळाघोडा येथील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मूर्तिशास्त्र आणि शिल्पकलेचे तज्ज्ञ, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलपती डॉ़ गोरक्ष देगलुरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलारसिंकासाठी खुले राहणार आहे.या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाविषयी ज्येष्ठ कलाकार वासुदेव कामत यांनी सांगितले, उपनिषदे आणि वेदांवर मालिका करावी, असे खूप काळ मनात होते, पण नेमके काय करायचे, हे कळत नव्हते. मात्र, त्या काळातील कथांचे कायमच खूप आकर्षण वाटायचे. या कथांच्या आधारे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, त्याविषयी कलाकृती तयार कराव्यात हा विचार आला, पण ते आव्हान होते. जी भाषांतरित उपनिषदे आहेत, त्यातील निवडकांचे वाचन करून, त्यातून एक गोष्ट लक्षात आली की, गुरू-शिष्यांतील संवादाला ‘उपनिषदे’ असे म्हटले जाते.यातील ‘कठोपनिषद’, ‘श्वेताश्वतरोपनिषद’ यांच्यातील शांतीपाठ जो आहे, आपण नेहमी म्हणतो. ते म्हणजे गुरू-शिष्याने केलेली प्रार्थना आहे. त्यामुळे याच्यावर चित्रे रेखाटण्याचे निश्चित केले. या चित्रांचे वैशिष्ट्य असे की, ही चित्रे रेखाटताना कायम एक नैसर्गिक शक्ती आपल्याला मदत करत असते, हा अनुभव याही कलाकृतींच्या निर्मितीच्या वेळी आला. गेल्या सहा महिन्यांपासून या प्रदर्शनावर काम सुरू होते, एकूण २१ कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.
प्राचीनतेचा सर्जनशील आविष्कार, वासुदेव कामत यांच्या कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:18 AM