लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि ज्येष्ठ कवी-गीतकार प्रवीण दवणे यांना अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘शुक्रतारा मंद वारा’ या गाण्याच्या ६०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित विशेष संगीत सोहळ्यात पहिला अरुण दाते कला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
४ ऑक्टोबर रोजी बोरिवली पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात रात्री आठ वाजता अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते यांनी संगीत सोहळ्यासह पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्यात मंदार आपटे, पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी व श्रीरंग भावे हे गायक अरुण दाते, अशोक पत्की आणि प्रवीण दवणे यांची गाणी सादर करतील. या कार्यक्रमाला भाजप आमदार व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. सप्टेंबर १९६२ मध्ये ‘शुक्रतारा मंद वारा’ या गाण्याचे आकाशवाणीवर रेकॉर्डिंग करण्यात आले. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला प्रख्यात गायक-संगीतकार केशवराव भोळे, पु. ल. देशपांडे, अरुण दाते यांचे वडील रामूभय्या दाते आणि संगीतकार भाऊ रवी दाते उपस्थित होते. अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जवळपास पावणेतीन हजार प्रयोग केले.
या कार्यक्रमात १००हून अधिक गायिकांनी गायन केले. अरुण दाते यांचा सर्वच प्रसारमाध्यमांशी खूप जवळचा संबंध होता; परंतु ‘लोकमत’बरोबरचे त्यांचे नाते खास होते. त्यामुळे या कार्यक्रमाला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक म्हणून लाभल्याने अतुल दाते यांनी खूप आनंद झाल्याचे सांगितले. रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"