Join us

साठ वर्षं एक गाणं कसं जिवंत राहिलं..?

By अतुल कुलकर्णी | Published: October 03, 2022 8:22 AM

अरुण दातेंचं एक गाणं साठ वर्षांपूर्वी तयार झालं. तरीही लोकांना ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं.

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

एक गाणं साठ वर्षांपूर्वी तयार झालं. तरीही लोकांना ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. या गाण्याला ज्यांचे ज्यांचे हात लागले, त्यातलं कोणीही आज जिवंत नाही. मात्र ते गाणं या सगळ्यांच्या आठवणी उराशी कवटाळून तितक्याच रसरशीतपणे रोज नव्याने आपल्याला भेटतं..! हे भाग्य फार कमी गाण्यांच्या नशिबी असतं. या एका गाण्याने महाराष्ट्राला उत्तम भावगीत गायक दिला. भावगीतं ऐकण्यासाठीचा कान तयार केला.

या गाण्याची कथा तेवढीच रंजक आहे. यशवंत देव मुंबई आकाशवाणी केंद्राचे प्रमुख होते. ते उत्तम रेकॉर्डिंग करायचे. त्यावेळी ‘भावसरगम’ हा लोकप्रिय कार्यक्रम ते करायचे. त्यांची एक सवय होती. वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रम ऐकायचे. त्यातले नवनवे गायक कसे गातात हे ऐकायचे. एकदा त्यांनी इंदोर रेडिओ स्टेशन लावले. त्यावेळी एक २८ वर्षांचा हिंदू मुलगा उर्दू गझल गात होता. गाण्याच्या शेवटी त्या मुलाचं नाव त्यांनी ऐकलं. ते होतं अरविंद रामचंद्र दाते. यशवंत देवांनी दुसऱ्या दिवशी श्रीनिवास खळे यांना आकाशवाणी केंद्रात बोलावून घेतले. त्यांना ते गाणे ऐकवले. तेव्हा खळेही त्या आवाजाच्या प्रेमात पडले. यशवंत देवांनी इंदोर रेडिओ स्टेशनला संपर्क केला. त्यांना सांगण्यात आले की, हे गायक आता मुंबईत असतात. त्यांचा पत्ता घेऊन देवांनी मुंबई आकाशवाणीकडून तीन पत्र अरविंद यांना पाठवली, पण एकाचेही उत्तर त्यांना आले नाही. ते कळताच खळे दातेंच्या घरी पोहोचले. 

तुमच्या मुलाला तीन पत्र पाठवली, पण तो उत्तरही देत नाही अशी तक्रार खळेंनी अरविंदच्या वडिलांकडे केली. तेव्हा अरविंद दाते म्हणाले, आम्ही इंदोरचे आहोत. आमच्या मराठी बोलण्याला तिथले लोक हसतात. तेव्हा मी मराठी गाणं कसं गाणार..? तेव्हा खळे काकांनी ते तुम्ही माझ्यावर सोडा, असे सांगून रेकॉर्डिंगसाठी अरविंदना बोलावून घेतले. मंगेश पाडगावकर यांनी गाणे लिहिले होते. यशवंत देव रेकॉर्डिंगसाठी हजर होते. प्रख्यात म्युझिक अरेंजर अनिल मोहिलेंचे, अरेंजर म्हणून ते पहिले गाणे होते. रामूभैया दातेंचा मुलगा कसा गातो हे ऐकायला केशवराव भोळे आणि पु. ल. देशपांडे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हजर होते. द्वंद्वगीत असल्यामुळे सोबत गाण्याकरता सुधा मल्होत्रा होत्या. एवढ्यांच्या उपस्थितीत ते गाणं रेकॉर्ड झालं...!

गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. ज्या दिवशी गाणे मुंबई आकाशवाणी केंद्रावर लागणार होते, त्यावेळी दातेंच्या घरात सगळे रेडिओ समोर बसले. निवेदकाने सांगितले, यानंतरचे गाणे आपण ऐकणार आहात, ‘सुधा मल्होत्रा आणि अरुण दाते यांच्या आवाजात...’ गाणे सुरू झाले. गाण्याचे शब्द होते ‘शुक्रतारा... मंद वारा...’ आवाज तर आपला आहे, मात्र नाव अरुण दातेंचे कसे..? असा प्रश्न अरविंद दाते यांना पडला. जवळच यशवंत देव राहत होते. घाईघाईत ते त्यांच्याकडे गेले. आवाज तर माझा होता नाव अरुण दाते असे का आले..? आता सवाल त्यांनी केला. तेव्हा यशवंत देव म्हणाले, मला सकाळीच निवेदकाचा फोन आला. तो म्हणत होता, आपल्या रजिस्टरवर ए. आर. दाते असे लिहिले आहे. आपल्याकडे असे इनिशियल चालत नाही. पूर्ण नाव लागते. तुम्हाला घरी सगळे अरु... अरू... म्हणताना मी ऐकले होते... म्हणून मी अरुण दाते असे लिहून दिले...! त्या दिवशी ते गाणे प्रचंड लोकप्रिय झाले... आणि अरविंद दातेच्या जागी अरुण दाते या नावाचा जन्मही झाला..! 

या गोष्टीला आज ६० वर्षे पूर्ण झाली. या एका गाण्याने पुढे इतिहास रचला. अरुण दाते यांनी या गाण्याचे पावणेतीन हजार कार्यक्रम केले. शंभराहून अधिक गायिका त्यांच्यासोबत हे गाणे गायल्या. या प्रवासातील एकही व्यक्ती आज हयात नाही. मात्र त्यांनी केलेलं सूर्यकाम आपल्यासमोर आजही लखलखीत उभे आहे. आपल्यासाठी चार-पाच मिनिटांचे गाणे असते... मात्र त्यामागची कथा किती रंजक असू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. गाण्याच्या साठीनिमित्त ४ ऑक्टोबर रोजी अरुण दाते यांचे पुत्र अतुल दाते यांनी मुंबईत अशोक पत्की आणि प्रवीण दवणे यांना अरुण दाते यांच्या नावाचा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

रोजच्या राजकीय बातम्यांपासून दूर, कोण कोणाच्या गटात राहणार, कोण कोणाच्या गटात जाणार, याच्या पलीकडे देखील काही लोकांनी करून ठेवलेले शाश्वत काम कसे इतिहास घडवते, त्यासाठी आजचा कॉलम स्वर्गीय अरुण दाते यांना समर्पित..! 

जाता जाता : विषय गाण्याचा निघालाच आहे, तेव्हा सोनाली कर्णिक या गायिकेने आपली गाण्याची २५ वर्षाची कारकीर्द विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात उत्साहात साजरी केली. १९९७ मध्ये तिने गायला सुरुवात केली. लता मंगेशकर यांच्या हस्ते तिला उत्कृष्ट गायिका म्हणून पुरस्कार मिळाला आणि आपल्या गाण्याच्या कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाले म्हणून, सोनालीने लता मंगेशकर यांची निवडक गाणी घेऊन स्वतःचा सोलो कार्यक्रम केला. सोनाली दर्जेदार गाणं गाणारी गायिका आहे तेवढीच ती विनम्रही आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :arun date