Join us

अर्थमंत्री सीतारमण यांच्या हस्ते अरुण जेटली यांच्या स्मारकाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:07 AM

मुंबई : देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिवंगत अरुण जेटली हे एक महान राजकारणी आणि कायदे तज्ज्ञ ...

मुंबई : देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिवंगत अरुण जेटली हे एक महान राजकारणी आणि कायदे तज्ज्ञ होते. भेटली आणि मुंबई यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे मुंबईत जेटली यांच्या स्मृतीला साजेसे स्मारक उभे राहिले ही बाब यथोचित आहे. या स्मारकाचे उद्घाटन मला करता आले, याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली मानते, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

निर्मला सीतारमण यांच्या आज मुंबईतील जसलोक हॉस्पिटलसमोरील डॉक्टर निवासजवळ अरुण जेटली यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाल शेट्टी, प्रफुल पटेल, संगीता अरुण जेटली, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. यानंतर लोढा फाउंडेशन तसेच स्व. अरुण जेटली फाउंडेशनच्यावतीने फिल्म्स डिव्हिजनच्या सभागृहात स्मृती कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांसह विविध देशांच्या दूतावासांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राजकारणात योग्य सल्ला देणारा गुरू असावा लागतो. अरुण जेटली यांच्या माध्यमातून मला तो भेटला. विविध प्रसंगात त्यांनी मोलाचे सल्ले दिले. पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्याचा सल्लाही त्यांचाच होता, असे सीतारमण यावेळी म्हणाल्या.

तर, अरुण जेटली यांनी आपल्या कामात राष्ट्राशी कधीही तडजोड केली नाही. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी जेटली यांचे स्मरण जेटली यांनी सुरू केलेल्या आर्थिक परिवर्तनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळाल्याचे सांगितले.

जेटली यांच्या स्मारकासाठी शरद पवारांचे सहकार्य

दिवंगत अरुण जेटली यांच्या स्मारकाच्या निर्मितीत काही अडचणी आल्या. त्यावेळी शरद पवार यांनी हस्तक्षेप करत त्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्मारकाचा मार्ग मोकळा झाला. याचा आवर्जुन उल्लेख करत सीतारमण आणि मंगलप्रभात लोढा यांनी शरद पवार यांचे आभार मानले.