अरुण पौडवाल स्मृती कृतज्ञता गौरव पुरस्कार त्यागराज खाडीलकर यांना जाहीर
By संजय घावरे | Published: May 30, 2024 09:22 PM2024-05-30T21:22:04+5:302024-05-30T21:22:35+5:30
मुंबई - अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार' यंदा गायक, ...
मुंबई - अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा 'कृतज्ञता गौरव पुरस्कार' यंदा गायक, सूत्र संचालक व संगीतकार त्यागराज खाडीलकर यांना जाहीर झाला आहे. मुंबईत एका छोटेखानी सोहळयामध्ये पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते त्यागराज यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अरुण पौडवाल स्मृती कृतज्ञता गौरव पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे. २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता पुरस्कार प्रदान सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या खार येथील निवासस्थानी संपन्न होणार आहे. याच वेळी स्वरकुल ट्रस्टतर्फे सादर झालेल्या 'तिमीरातूनी तेजाकडे' या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बममधील दोन गायकांना अनुराधा यांच्या हस्ते प्रत्येकी ११ हजारा रुपयांची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. यापूर्वी संगीतकार राम कदम, पार्श्वगायक जी. मल्लेश, संगीतकार यशवंत देव, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, अरुण दाते, गिटार वादक रमेश अय्यर, सुनील कौशिक, ध्वनीमुद्रक डी. ओ. भन्साळी, अविनंदन टागोर, हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, गायक गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे या मान्यवरांना अरुण पौडवाल स्मृति कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.