अरुण साधू हे व्यक्तिगत जीवनात साधूसारखेच जगले - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:34 AM2017-10-05T02:34:48+5:302017-10-05T02:35:21+5:30
अनेक व्यक्तिमत्त्वाचे पैलू असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू हे व्यक्तिगत जीवनात साधूसारखेच जीवन जगले, अशी भावना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई : मितभाषी, मुद्द्यावर ठाम राहणारे, सुसंवादी, प्रगल्भ विचारी, शोधक नजर, साधी राहणी अशा अनेक व्यक्तिमत्त्वाचे पैलू असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू हे व्यक्तिगत जीवनात साधूसारखेच जीवन जगले, अशी भावना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
अरुण साधू यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गं्रथालीतर्फे नरिमन पॉइंट येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात आयोजित स्मृती सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर व दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे, लेखिका मीना गोखले, आमदार हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मराठी माणसांच्या मनात पक्के स्थान निर्माण करणाºयांपैकी अरुण साधू एक होते. दलित पँथरवर साधू यांची आस्था होती. या चळवळीला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडलेली होती. साहित्य संमेलनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली तेव्हा त्यांनी ‘ज्ञानभाषा म्हणून मराठी भाषेचा विकास होणे गरजेचे आहे...’ असे विचार मांडले होते.
कुमार केतकर म्हणाले, साधू आणि मी तासन्तास सोबत असायचो. आणीबाणी, शिवसेनेची स्थापना, काँग्रेस फूट, चीन क्रांती, जर्मनीत होत असलेले बदल आणि माओवादी अशा अनेक विषयांवर त्यांनी लिहिले. १९६६ ते १९७६ या काळात त्यांनी देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील विषयांवर लिहिले.
पृथ्वीबाहेर जीवसृष्टी असेल यावर अभ्यास केला. ब्रिटिशांनी कशा प्रकारे रेल्वे सुरू केली असेल? यावर त्यांनी उत्सुकता निर्माण केली. साधू यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य जनसामान्यापर्यंत पोहोचवायचे होते.
‘माणूस आपल्याला कळतो का... की तो फक्त आपल्याला अपुरा कळतो...’ अशी भावना दिनकर गांगल यांनी साधू यांच्याविषयी व्यक्त केली. साधू आणि माझी भेट १९५९ साली झाली. ते वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर असत. साधू यांच्या जगण्यामध्ये एक प्रकारचे मर्म होते. साधू हे टाइपराइटरवर असे तुटून पडत की बोका उंदरावर तुटून पडतो; अगदी त्याचप्रमाणे साधू यांचे काम असे, असेही गांगल म्हणाले.
जब्बार पटेल म्हणाले की, साधू यांचा अभ्यास महाराष्ट्र, भारतापुरता मर्यादित न राहता जगभरातील राजकारणाचा, वेगवेगळ्या क्रांती-चळवळींचा होता.