Join us

वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया कडून प्रभू श्रीरामाचे शिल्प बनविणाऱ्या अरुण योगीराज यांचा सन्मान

By मनोहर कुंभेजकर | Published: January 21, 2024 4:58 PM

अयोध्या नगरीत श्री रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्याचा सोहळा उद्या होणार आहे.

मुंबई-अयोध्या नगरीत श्री रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्याचा सोहळा उद्या होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू असतानाच मंदिराच्या ट्रस्ट कडून राम मंदिराच्या गर्भगृहासाठी रामलल्लांची मूर्ती हि कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती अंतिम झाल्याची नुकतीच घोषणा केली आहे. प्राणप्रतिष्ठा केली जाणारी मूर्ती ५१ इंची असून यामध्ये प्रभू श्री रामाचे पाच वर्षाचे रूप दिसणार आहे. 

अरुण योगीराज हे मूळचे कर्नाटकातील मैसूर येथील असून त्यांनी आतापर्यंत अनेक आकर्षक मूर्त्या त्यांनी साकारलेल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या रामलल्लाची मूर्ती विधी सोहळ्यांमध्ये सर्वांसमोर येणार आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया घेण्यात आलेली असून त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.

 वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी त्यांची पत्नी विजेता योगीराज यांच्याशी संवाद साधला असता, आपल्यासाठी हा सर्वात उत्तम सन्मान आहे असे म्हटले आहे.

सुषमा नार्वेकर म्हणाल्या की, रामललाची 51 इंच उंचीची सुबक मूर्ती ही अरुण योगीराज यांच्या मेहनतीने आणि एकाग्रतेमुळेच शक्य झाली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपावा यासाठी दैवी कलाकृतीचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया कडून त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे.