मुंबई: केईएम रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षे अरुणा शानबाग यांची शुश्रूषा केली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा यांनी केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्र ४ मध्ये अखेरचा श्वास घेतला. अरुणा शानबाग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना संगीतमय आदरांजली वाहिली. अरुणा शानबाग यांच्यावर एका वॉर्डबॉयने अतिप्रसंग केल्यामुळे त्या वेजिटेटिव्ह स्टेजमध्ये गेल्या होत्या. त्यानंतरची तब्बल ४२ वर्षे त्या याच स्थितीत होत्या, पण केईएम रुग्णालयाच्या परिचारिका आणि डॉक्टरांनीच त्यांची सर्व काळजी घेतली होती. दरवर्षी अरुणा यांचा वाढदिवस आणि परिचारिका दिन त्यांच्याबरोबर साजरा केला जात होता. परिचारिका दिनी अरुणा आमच्यासोबत नसल्यामुळे परिचारिकांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी दुपारी १२ वाजता केईएम रुग्णालयात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. १८ मे रोजी अरुणा यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. म्हणून त्यांना संगीतमय आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या वेळी परिचारिकांनी अरुणा यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)
अरुणा शानबाग यांना केईएममध्ये आदरांजली
By admin | Published: May 15, 2016 4:15 AM