मुंबई - दिल्लीमध्ये भाजपा नेत्यांनी प्रसिद्ध केलेले आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तक प्रकाशनामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठली आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम लेखक अरविंद जगताप यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
अरविंद जगताप यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये सत्ता बदलल्यानंतर काही जण आपला ईमान बदलतात असा टोला लगावला आहे. 'राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात. आपला राजा बदलतात. पण मावळ्यांचे राजे नेहमी एकच असतात. छत्रपती शिवाजी महाराज. आजपण, उद्यापण, कधीपण' असं अरविंद जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरविंद जगताप यांनी केलेली ही पोस्ट फेसबुकवर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहेत. तसेच, अनेकांनी या पोस्टला लाईक केले असून प्रतिक्रियाही दिल्या आहे.
काही दिवसांपूर्वी अरविंद जगताप यांनी स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्न तरी दाखवू नका आणि पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मतं मागू नका अशा शब्दांत कुठल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख न करता राज्यातील युती आणि आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. तसेच स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेता निवडीसाठी नाही असे म्हणत अरविंद जगताप यांनी विधीमंडळ गटनेतेपदाची निवड करण्यावरूनही आपल्या लेखनीतून राज्यातील नेत्यांना टोला लगावला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर संजय राऊत, छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. तर शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या शिवेंद्र राजे भोसलेंनीही या पुस्तकावर लागलीच बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनीही यावरून भाजपालाच घरचा आहेर दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यासह देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर पुरुषांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात. ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असले प्रकार होतात. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर चिखलफेक आणि आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळते. अशा अतिउत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मी पक्षनेतृत्वाला विनंती करत आहे. त्यांना योग्य ती समज द्या. या पुस्तकाचं प्रकाशन झालं असलं तर ते थांबवावं किंवा ते पुढे वितरीत करू नये, असंही शिवेंद्र राजे भोसले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं
मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचा भुजबळांकडून खरपूस समाचार, म्हणाले...
मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल
मोदींची तुलना शिवरायांशी, भाजपच्या पुस्तकावर संताप; शिवप्रेमींकडून टीकेची झोड
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...