आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:51 AM2024-05-18T05:51:45+5:302024-05-18T05:53:01+5:30
मोदी यांनी हा केवळ पवार किंवा ठाकरे यांचा अपमान केला नाही. तर हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : या निवडणुकीनंतर ते मला, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना तुरुंगात टाकू इच्छित आहेत. जर आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे वय ८४ आहे. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ते १० वर्षांनी मोठे आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला भटकती आत्मा म्हणाले. उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणाले. प्रधानमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभते का? मोदी यांनी हा केवळ पवार किंवा ठाकरे यांचा अपमान केला नाही. तर हा महाराष्ट्राचा अपमान केला आहे. बटन दाबून तुम्ही त्याचा बदला घ्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
शाळा, दवाखाने दिल्यानेच मला अटक
दिल्लीत गरीब मुलांसाठी चांगल्या शाळा उभारल्या. मोदी गरीब मुलांना शाळा देऊ इच्छित नाहीत. आम्ही मोहल्ला क्लिनिक उभारले, मोदींना ते बंद करायचे आहेत. मला मधुमेहाचा आजार आहे. मी जेलमध्ये असताना मला इन्सुलिन दिले नाही. त्यामुळे माझी शुगर वाढली. हे मला औषध न देऊन माझ्याशी काय करू इच्छित होते, असाही प्रश्न त्यांनी केला.