Join us

"५६ वर्षात असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही"; केजरीवालांनी मोदी सरकारला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 7:49 PM

दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल, पंजाब CM भगवंत मान यांनी आज मुंबईत शरद पवारांची घेतली भेट

Arvind Kejriwal vs BJP: 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकार विरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. शरद पवार हे देशातील सर्वात वरीष्ठ नेत्यांपैकी एक आहेत आणि त्यांनी संसदेत या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष आणि इतर गैरभाजप पक्षांशी बोलले पाहिजे असेही केजरीवाल म्हणाले. याशिवाय, मोदी सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश म्हणजे ५६ वर्षांच्या संसदीय जीवनात निवडून आलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही, असे केजरीवाल म्हणाले.

केंद्रातील भाजप सरकार आमदारांच्या घोडे बाजारकरुन ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भय निर्माण करण्यासाठी आणि लोकप्रिय सरकारच्या विरोधात अध्यादेश जारी करून गैरभाजप सरकार पाडण्यासाठी अन्यायकारक मार्ग वापरत आहेत. दिल्लीत कायदेशीररीत्या निवडून आलेल्या आप सरकारचे अधिकार मर्यादित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारने राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली दुरुस्ती विधेयक २०२३ अंमलात आणले आणि त्या प्रभावाखाली एक अध्यादेश जारी केला आहे. देशाच्या संसदीय पद्धतीला ५६ वर्षे झाली आहेत पण ५६ वर्षांच्या संसदीय जीवनात निवडून आलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही, असा घणाघात केजरीवालांनी केला.

दिल्लीतील आप सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. असे अध्यादेश आणणे म्हणजे देशातील संसदीय लोकशाही मर्यादित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादीचे खासदार या विधेयकाला संसदेत विरोध करतील असे आश्वासनही शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यावेळी दिले.  

टॅग्स :अरविंद केजरीवालशरद पवारनरेंद्र मोदीभाजपा