मुंबई: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आले, याचा मला आनंद आहे. आम्हाला अनेक दिवसांपासून भेटायचं होतं. मी यापूर्वीच सांगितलं आहे की, देशातील सर्व विरोधकांशी चर्चा सुरू आहेत, संपर्क केले जात आहेत. आपल्या देशाला अधिक मजबूत करण्यासाठी आणि देशाच्या भल्यासाठी सोबत मिळून काय करता येईल, याची चर्चा झाली आहे. हीच आमची विचारधारा आहे,' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं काम केलं. माझी अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. आमच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. देशातील गंभीर परिस्थिती, देशातील बेरोजगार तरुण आणि महागाई अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी भगवंत मान यांनीही पंजाब आणि महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान असल्याचे सांगितले.