खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या...; केजरीवाल-ठाकरे भेटीवर नितेश राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:25 PM2023-02-25T12:25:23+5:302023-02-25T12:26:14+5:30
आपच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.
मुंबई - राज्यातील राजकारणात भाजपा, शिंदेंची शिवसेनाविरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहे. शिवसेना नाव, चिन्ह हे एकनाथ शिंदेंचा देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे पुढे काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यात उद्धव ठाकरे पक्षसंघटना टिकवण्यासोबतच भाजपाविरोधात वातावरण निर्मिती करत आहेत. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या दोघांनी मातोश्रीत येत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
आपच्या मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. भाजपा आमदार नितेश राणेंनीही या भेटीवरून ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
आधी मुंबई बॅाम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले.आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात.यावरून हेच सिद्ध होते जन्माने संपत्तीत वारसा मिळतो पण आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही.@OfficeofUT
— nitesh rane (@NiteshNRane) February 25, 2023
'सोबत मिळून काय करता येईल, यावर भेटीत चर्चा'
या भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आले, याचा मला आनंद आहे. आम्हाला अनेक दिवसांपासून भेटायचं होतं. मी यापूर्वीच सांगितलं आहे की, देशातील सर्व विरोधकांशी चर्चा सुरू आहेत, संपर्क केले जात आहेत. आपल्या देशाला अधिक मजबूत करण्यासाठी आणि देशाच्या भल्यासाठी सोबत मिळून काय करता येईल, याची चर्चा झाली आहे. हीच आमची विचारधारा आहे असं सांगत त्यांनी भाजपावर टीका केली.
तर कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं काम केलं. माझी अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याची इच्छा होती. आमच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. देशातील गंभीर परिस्थिती, देशातील बेरोजगार तरुण आणि महागाई अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी भगवंत मान यांनीही पंजाब आणि महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान असल्याचे म्हटलं.