'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:02 PM2023-02-24T21:02:22+5:302023-02-24T21:02:46+5:30
'भाजपला आमची भीती वाटते, म्हणूनच ते ED-CBIचा वापर करतात.'
मुंबई: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. भेटीनंतर तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
देशात भीषण महागाई
आज देशातील तरुण बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्यांची आश्वासने दिली होती, पण त्यांना नोकरी मिळत नाहीये. महागाई प्रचंड वाढलीये, कमाई कमी आणि महागाई वाढत आहे. केंद्र सरकार काही ठराविक उद्योजकांना फायदा देण्यासाठी देशाला गहाण ठेवत आहे, मोठ-मोठ्या संस्था विकत आहे. एलआयसी घाट्यात गेली आहे, कोट्यवधी लोकांच्या पैशांचे काय होणार. आपला देश तेव्हाच पुढेल जाईल, जेव्हा आपण एकमेकांपासून काहीतरी शिकू, लढू नाही, असं केजरीवाल म्हणाले.
उद्ध ठाकरेंचा पक्ष चोराल...
ते पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात खूप घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांचे चिन्ह आणि नाव चोरी केले. यांचे वडील वाघ होते आणि हे वाघाचे पूत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होणार. भाजपला फक्त गुंडगिरी येते, बाकी काही नाही. घाबरट लोक ईडी, सीबीआयचा वापर करतात. त्यांना आमची भीती वाटते, म्हणूनच ते याचा वापर करतात. आम्हाला फरक पडत नाही, सत्याचा विजय होणार, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.