Join us

शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 3:55 PM

अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल माफी मागितली आहे.

Arvind Sawant : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या शायना एनसी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. अरविंद सावंत यांनी आपल्याला इम्पोर्टेड माल म्हटले असल्याची तक्रार शायना एनसी यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर आता अरविंद सावंत यांनी माफी मागितली आहे. कालच्या दिवसापासून असं वातावरण तयार केले आहे की मी एका महिलेचा अपमान केला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही महिलेचा अपमान केला नाही, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी इम्पोर्टेड माल म्हटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला कधीही हेतू नसल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. अरविंद सावंत यांच्या शायना एनसीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर गदारोळ झाला होता. शायना एनसी यांनी त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला होता.

"कालपासून असे वातावरण तयार केले जात आहे की मी एका महिलेचा अपमान केला आहे. मी माझ्या आयुष्यात असे कधीच केले नाही. ज्या पद्धतीचे विधान केले होते, त्याचा वेगळा अर्थ काढून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. त्याबद्दल मी दु:खी आहे. पण तरीही माझ्या वक्तव्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो. मी त्यांचा आदर करतो. मी माझ्या गेल्या ५५ ​​वर्षात कधीही कुठल्या महिलेचा अपमान केला नाही, आजही करणार नाही, उद्याही करणार नाही. मला आशा आहे की देशातील महिलांच्या सन्मानाकडे पक्षासारखे पाहिले जाऊ शकत नाही," असे अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी शिंदे गटाच्या नेत्या आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या इम्पोर्टेड माल या विधानाविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ७९ आणि कलम ३५६ (२) अंतर्गत अरविंद सावंत यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकमुंबादेवीअरविंद सावंत