Join us

सावंत यांची हॅटट्रिक की, नव्या चेहऱ्याला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:07 AM

२०१४ आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत यांनी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र, यंदाचे चित्र वेगळे आहे.

संतोष आंधळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघातून दोनवेळा  खासदार म्हणून निवडून आलेले उद्धवसेनेचे अरविंद सावंत यांचा मुकाबला यावेळी त्यांच्या एकेकाळच्या सहकारी शिंदेसेनेच्या यामिनी जाधव यांच्यासोबत होणार आहे. आमदार आणि नगरसेवक पदाचा अनुभव असणाऱ्या जाधव यांना भाजप या मित्रपक्षाचा पाठिंबा आहे. त्यामुळे सावंत यांची या मतदारसंघातून खासदारकीची हॅटट्रिक होते का? की जाधव यांच्या रूपाने लोकसभेत नवीन चेहरा पाहायला मिळतो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. 

२०१४ आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत यांनी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र, यंदाचे चित्र वेगळे आहे. या मतदारसंघातील वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघांत उद्धवसेनेचे दोन आमदार आहेत. तर मलबार हिल आणि कुलाबा या दोन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. भायखळ्यात शिंदेसेना आणि मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे. 

मतदारसंघाचा इतिहास या मतदारसंघात काँग्रेसच्या देवरा कुटुंबीयांचा वरचष्मा राहिला आहे. लोकसभेच्या सहा निवडणुकांत नागरिकांनी देवरा कुटुंबातील सदस्याला खासदार म्हणून निवडून संसदेत पाठवले आहे. तर अन्य चारवेळा काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आला आहे. १९५२, १९५७ आणि १९६२ मध्ये स. का. पाटील हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस संयुक्त सो पार्टीकडून खासदार झाले होते. ११९६ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार जयवंतीबेन मेहता या ठिकाणाहून निवडून आल्या होत्या. १९५२ पासून झालेल्या  निवडणुकांतील एखादा अपवाद वगळता मतदानाचे सर्वसाधारण प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या घरात राहिले आहे. 

अरविंद सावंत I उद्धवसेना 

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून स्थान त्यांनी  मिळवले. सावंत यांचा पक्षात ५० वर्षाहून अधिक काळ गेला आहे. उत्तम भाषणशैली असलेले सावंत यांनी महानगर टेलिफोन निगम कर्मचारी संघटनेचे नेतृत्व केले आहे. १९९६ मध्ये अरविंद सावंत यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर २०१० मध्ये त्यांची  शिवसेना प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.  सावंत मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर २०१४ आणि २०१९ ला खासदार म्हणून निवडून आले आहेत. मोदी २.० सरकारमध्ये त्यांनी साडेपाच महिन्यांसाठी अवजड उद्योग मंत्रालयाच्या मंत्रिपदी काम केले आहे.  

यामिनी जाधव I शिंदेसेना  जाधव दाम्पत्य हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रिय आहे. यामिनी यांचे पती यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’शी चांगले संबंध होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळले आहे. यामिनी जाधव २०१२ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून महापालिकेत निवडून आल्या. त्यांना २०१९ मधून भायखळा विधानसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून मुस्लिमबहुल मतदारसंघातून अभूतपूर्व विजय मिळवून त्या आमदार झाल्या. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्या शिंदेसेनेमध्ये सामील झाल्या होत्या. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्या घरावर आयकर खात्याची धाडही पडली होती. 

टॅग्स :मुंबई दक्षिणअरविंद सावंत