मुंबई - मागील काही काळात मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले. मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, नोकरीत प्राधान्य न देणे याच्या बातम्या झळकल्या. अनेकदा आंदोलने झाली, मात्र तरीही पुन्हा तसेच प्रकार घडत असल्याचं पुढे आले आहे. मुंबईतील मरोळ इथल्या एका कंपनीनं त्यांच्या जाहिरातीत नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख करत मराठी माणसाला डावलण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग आहेत. मात्र मुंबईत मराठी माणसांना नोकरीत स्थान नाही हे या जाहिरातीतून अधोरेखित होत आहे. Indeed या साईटवर मरोळच्या आर्या गोल्ड नावाच्या कंपनीनं मॅनेजर पदासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातील फक्त पुरुष उमेदवार आणि कंसात नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र ही चूक लक्षात येताच कंपनीनं जाहिरातीमधून हा उल्लेख काढला. पण या प्रकारामुळे मुंबईत पुन्हा मराठी माणसांची गळचेपी होतेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. झी २४ तास यांनी हे वृत्त प्रसारित केले आहे.
मनसे आक्रमक, कंपनीवर कारवाई करण्याची मागणी
या कंपन्यांची हिंमत का वाढली, अशा जाहिराती देत असतील तर शासनानं या कंपन्यांना ज्या जागा, सवलती दिल्या आहेत त्या त्वरीत रद्द केल्या पाहिजेत. जर सरकारला कारवाई करता येत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ही कारवाई करेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कंपनीची आणि प्रशासनाची असेल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. त्याशिवाय महाराष्ट्राची वीज, पाणी, सुखसुविधा वापरणार आणि मराठी माणसांना नोकरी नाकारणार त्यापेक्षा हे उद्योग बाहेर गेलेले बरे, सरकार म्हणून कारवाई होणं गरजेचे आहे जेणेकरून या लोकांना जरब बसेल असं देशपांडे यांनी म्हटलं.
...तर ठोकून काढा, शिवसेना खासदार संतापले
दरम्यान, अशाप्रकारची हिंमत जर कुणी महाराष्ट्रात करत असेल तर त्यांना ठोकून काढलं पाहिजे, २ कानाखाली मारल्या पाहिजे त्याशिवाय अशा प्रवृत्ती बंद होणार नाही. महाराष्ट्रात राहून असं धाडस कुणी करत असेल तर त्यांना प्रसाद देणं गरजेचे आहे. खासदार बेकायदेशीर गोष्टी सांगतोय असं तुम्ही म्हणाल, मात्र ही हिंमत कुणामध्ये होता कामा नये. सरकारकडून या प्रकारावर ताबडतोब कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.