Join us

आर्यमनच्या कवितेत दडलीय जीवनाकडे पाहण्याची दृष्टी!; जावेद अख्तर यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 2:08 AM

वरळी येथील लोढा सुप्रिमस येथे शुक्रवारी सायंकाळी आर्यमन दर्डा यांच्या ‘स्नो फ्लेक्स’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशनाचा सोहळा रंगला.

मुंबई : वयाची तिशी ओलांडताना कविता सुचू लागते. त्या आधीची मुले कवितेतून स्वप्नरंजनात रमतात. मात्र, अवघ्या १६व्या वर्षी आर्यमनच्या कवितेत थक्क करणारा जीवनविषयक दृष्टिकोन, तसेच भौतिक सुखापलीकडील जीवन अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी दिसून येते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संवेदनशील कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी काढले.वरळी येथील लोढा सुप्रिमस येथे शुक्रवारी सायंकाळी आर्यमन दर्डा यांच्या ‘स्नो फ्लेक्स’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशनाचा सोहळा रंगला. याप्रसंगी, ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व गीतकार प्रसून जोशी उपस्थित होते. अख्तर म्हणाले की, जुन्या पिढीने आई-वडिलांकडून संस्कार, मूल्य आणि विचारांची शिदोरी आमच्या पिढीला दिली. मात्र, आताच्या पिढीतील पालक हेच देणं पुढच्या पिढीला देण्यात कमी पडत आहेत. सध्याची पालकांची पिढी भौतिक सुखाच्या मागे धावते आहे. मात्र, असे असूनही आर्यमनच्या पालकांनी त्याला दिलेले संस्कार, विचारांची शिदोरी मौल्यवान असून, त्यातून सृजनशीलतेची प्रेरणा आर्यमनला मिळाली आहे.या वेळी ज्येष्ठ कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांनीही आर्यमनच्या कवितांचे कौतुक केले. एवढ्या लहान वयात आर्यमनचा कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन थक्क करणारा आहे. वन्य जीवनाकडे शिकार म्हणून न पाहता, याच वन्य जीवनाकडे जगण्याची अभिलाषा म्हणून पाहणे हा अत्यंत प्रेरणादायी विचार कवितेत आहेत. बऱ्याचदा भावना मनात ठेवणे सोपे असते, परंतु ते सर्वांसमोर मांडण्यासाठी धाडस लागते. कारण त्या भावनांवर प्रतिक्रिया उमटणार असतात, हे धैर्य आर्यमनने दाखविले, यासाठी त्याचे विशेष कौतुक आहे. हे धाडस दाखविण्यासाठी आर्यमनला लाभलेले पालकत्व हीसुद्धा भाग्याची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.रूपकुमार राठोड म्हणाले की, साहित्य, संगीत, अभिनय असो वा अन्य कोणत्याही कला त्यांना जोपासणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य दर्डा कुटुंबीयांनी केले आहे. संगीत क्षेत्रातील नवोदितांना देण्यात येणारा ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ हादेखील त्याचाच एक भाग असून, हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आहे. सध्याच्या जमान्यात सर्वच जण आत्मकेंद्री झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितीत इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या मुलाला घडविल्याबद्दल आर्यमनच्या पालकांचे विशेष कौतुक आहे.लहान वयात आर्यमनचा हा प्रवास पाहून त्याचा अभिमान वाटतो. या कार्यक्रमात त्याला आशीर्वाद देण्यासाठी दिग्गजांनी दर्शविलेली उपस्थिती त्याला कायम प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत आर्यमनचे वडील आणि ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी सर्वांचे आभार मानले.दिग्गजांनी सादर केल्या कविता,श्रोत्यांची मनमुराद दादउत्तरोतर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात जावेद अख्तर आणि प्रसून जोशी यांनी कविता सादर केल्या. त्यात अख्तर यांनी ‘ये वक्त क्या हैं... ये क्या हैं आखिर की जो मसल्सल गुजर रहा हैं’ ही कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या कवितेतील ‘जिसे समझते हैं हम गुजरता हैं वो थमा हंै, गुजरता हंै या थमा हुआ हंै, इकाई हैं या बंटा हुआ हैं, हैं मुंजमिद या पिघल रहा हंै, किसे खबर हैं किसे पता हंै?, ये वक्त क्या हैं? या ओळींवर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रसून जोशी यांच्या ‘क्या हैं कविता’ या काव्यालाही श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली. क वितेतील ‘दो घड़ी ठहर कर, जीवन की नदी को, बहते देखना हैं, कविता वहीं कहीं हैं’ या ओळींचे विशेष कौतुक केले. या दोन्ही दिग्गजांच्या रचनांनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.काव्यसंग्रहाच्या माध्यमातूनवन्यजीवन संवधर्नासाठी निधीपहिल्या काव्यसंग्रहाच्या विक्रीतून येणाºया निधीचा उपयोग निसर्ग व वन्यजीवन संवर्धनासाठी काम करणाºया स्वत:च्या ‘लिटल प्लॅनेट’ फाउंडेशन या संस्थेसाठी करण्यात येणार असल्याचे आर्यमनने नमूद केले. लहानपणी कार्टून्सऐवजी वन्यजीवन आणि निसर्गाकडे अधिक ओढ असल्याने कायम त्याकडे कल होता. यातून मग वयाच्या १०व्या वर्षी पहिली कविता लिहिल्याचे आर्यमनने सांगितले. काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर यातील ‘स्नो फ्लेक्स’ आणि ‘इनटू द वाइल्ड’ या कवितांचे वाचनही आर्यमनने केले.भविष्यात हिंदीतूनही कविता लिहिणार - आर्यमन दर्डाजावेद अख्तर यांनी आर्यमनला ‘कुठल्या भाषेतून विचार करतोस?’ असे विचारले. त्यावर आर्यमनने हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत विचार करतो, असे सांगत, भविष्यात हिंदी भाषेतही कविता लिहिणार असल्याचे नमूद केले. प्रसून जोशी यांनी आर्यमनला ‘कविता लिहिल्यावर हलके वाटते की जड वाटते?’ असे विचारल्यावर, आर्यमनने बºयाचदा संमिश्र भावना असल्याचे सांगितले. गिटारवादनाची आवड असलेल्या आर्यमनला रूपकुमार राठोड यांनी ‘कोणत्या कवितेला संगीतबद्ध केले आहे का?’ असे विचारले. यावर ‘अजून नाही,’ असे आर्यमनने सांगितले. त्या वेळेस राठोड यांनी भविष्यात हिंदी भाषेत काव्य लिहिल्यास अन् त्याला संगीतबद्ध केल्यास, ती रचना निश्चित गाण्याचे कबूल केले. आर्यमनचे आजोबा विजय दर्डा यांनी कविता लिहिताना शब्द आधी सुचतात की विचार? असे विचारले असता, ‘पहिल्यांदा विचार सुचतात अन् मग ते शब्दांत उमटतात,’ असे आर्यमनने सांगितले.बेटा, तुम्हारे उम्र में हम भीऐसेही थे ! : जावेद अख्तर म्हणाले की, कविता ही जाणिवेतून निर्माण होत नाही. त्यासाठी मनात दडलेल्या विचारांना साद घालावी लागते. त्यानंतर, कुठल्या तरी शांतसमयी मनाच्या कोपºयातून आपसूक हाक येते, त्याच क्षणी काव्य निर्माण होते. आर्यमनला या वयात हा प्रवास खूप सुंदर उलगडल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी ‘बेटा, तुम्हारे उम्र में हम भी ऐसेही थे’ असे म्हणत, उमेदीच्या काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

टॅग्स :मुंबईजावेद अख्तर