Join us

वीजमीटरसाठी आरेवासीय आक्रमक

By admin | Published: April 16, 2016 1:38 AM

आरे परिसरामध्ये ४८ झोपडपट्ट्या आणि २७ आदिवासी पाडे आहेत. यातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. काही ठिकाणी ट्रान्समीटर बसवूनही विजेचा पुरवठा करण्यात

मुंबई : आरे परिसरामध्ये ४८ झोपडपट्ट्या आणि २७ आदिवासी पाडे आहेत. यातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा करण्यात आला आहे. काही ठिकाणी ट्रान्समीटर बसवूनही विजेचा पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी ज्या ठिकाणी ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आरेमधील रहिवासी आंदोलन छेडणार आहेत.आरेमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरेमध्ये एकूण २७ आदिवासी पाडे आहेत आणि ४६ झोपडपट्ट्या आहेत. येथे काही ठिकाणी वीजपुरवठा करण्यात आला आहे. काही ठिकाणी ट्रान्समीटर बसवूनही विजेचा पुरवठा करण्यात आलेला नाही. यात नवपाडा रहिवासी संघ युनिट क्रमांक ६ येथे सुमारे ९३ घरे आहेत. मात्र त्यापैकी १८ घरांना मीटर बसवण्यात आले आहेत. वनीच्या पाड्यात ६० घरे आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी येथे ट्रान्समीटर बसवण्यात आला आहे. परंतु तरीही येथील घरांना वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. मटईपाडा युनिट क्रमांक २५ येथे १२५ घरे असून, त्यापैकी १९ घरांना मीटर बसवण्यात आले आहेत. युनिट क्रमांक १७ मधील ९० घरांपैकी २४ घरांना मीटर बसवण्यात आले आहेत.वस्तीमध्ये महापालिकेडून पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या निधीतून येथे विकासकामेही झाली आहेत. मात्र केवळ मीटर बसवण्यासाठी येथील रहिवाशांना सरकारी दरबारी खेटे घालावे लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुरावे असूनही संबंधितांना आरे प्रशासनाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्याचे चित्र आहे. जर आरे प्रशासनाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले तरच संबंधित ठिकाणी विजेचे मीटर बसविले जातील, असे कुमरे यांचे म्हणणे आहे. तरीही दखल घेण्यात आली नाही तर आरेमधील रहिवासी आंदोलन छेडतील, असा इशारा कुमरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)