Join us

Aryan Khan Bail : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर आजच दिवाळी, फटाक्यांची माळ उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 7:42 PM

आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत

ठळक मुद्देशाहरुखच्या चाहत्यांनी फटाक्याची माळ उडवून, वेलकम प्रिन्स आर्यन अशी बॅनरबाजी करुन आर्यनच्या स्वागताची तयारी केली आहे

मुंबई - शाहरुख खानचा सुपुत्र आर्यनला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, गेल्या २५ दिवसांपासून ड्रग्जप्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेला आर्यन खान आता लवकरच तुरुगांबाहेर येणार आहे. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी समजताच शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली असून दिवाळीपूर्वीच फटाके फोडले जात आहेत. आर्यनच्या स्वागताचे बॅनरही झळकले आहेत. 

आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. मात्र, आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि प्रोसिजर फॉलो करावी लागत असल्याने आर्यनचे आज तुरुंगातून बाहेर येणे जरा कठीणच आहे. मात्र, शाहरुखच्या घराबाहेर जल्लोष सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

शाहरुखच्या चाहत्यांनी फटाक्याची माळ उडवून, वेलकम प्रिन्स आर्यन अशी बॅनरबाजी करुन आर्यनच्या स्वागताची तयारी केली आहे. चाहत्यांच्या गर्दीचे, आनंदाचे व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. ट्विटरवर आर्यन खान बेल, आणि ब्लास्ट हे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. एकंदरीत, आर्यनच्या घराबाहेर आजच दिवाळी साजरी होत असल्याचं दिसून येतंय. 

निर्णयाची प्रत उद्याच मिळणार

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी अटीशर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :आर्यन खानन्यायालयशाहरुख खान