Join us

आर्यन खान प्रकरणाचा तपासकर्ता बडतर्फ; एनसीबीची कारवाई, वर्षभरापासून होता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 5:41 AM

ही कारवाई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.

मुंबई : कॉर्डिलिया क्रूझवरील अमली पदार्थांच्या कारवाईमध्ये शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचा (एनसीबी) अधीक्षक विश्वविजय सिंग याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. विश्वविजय सिंग गेल्या वर्षीपासून एका वेगळ्या प्रकरणामध्ये निलंबित होता. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आर्यन खान प्रकरणात कारवाई झाली. त्यावेळी वानखेडे यांच्या पथकात असलेल्या विश्वविजयविरोधात शिस्तभंगाच्या तसेच अन्य काही प्रकरणांत काही तक्रारी दाखल होत्या. तक्रारी वाढल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 

ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर शिस्तभंगाचा ठपका ठेवत अखेर सोमवारी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. 

आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आली. मात्र, या चौकशीचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो