आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो; वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:12 AM2021-11-22T11:12:05+5:302021-11-22T11:16:51+5:30
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे
मुंबई - आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता मध्यरात्रीची वेळ साधत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे. त्यानंतर, वानखेडे कुटुंबीयांनी हिंदू पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो शेअर करत मलिकांच्या फोटोबॉम्बला प्रत्युत्तर दिलंय.
कबूल है, कबूल है, कबूल है...
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येते. मात्र, त्याबाबत नवाब मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. पण, फोटोवरूनच सवाल केला आहे. 'कबूल है, कबूल है, कबूल है... यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?' असे प्रश्नार्थक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.
वानखेडे कुटुंबीयांचे स्पष्टीकरण
नवाब मलिक यांनी फोटो बॉम्ब फोडल्यानंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी लोकमतने वानखेडे कुटुंबीयांशी संपर्क साधला, तेव्हा वानखेडे कुटुंबातील एका सदस्याने समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्याही विवाहाचे फोटो शेअर केले. तसेच, आई मुस्लीम असल्याने तिच्या म्हणण्यानुसार मुस्लीम पद्धतीने लग्न केले होते. कारण, आम्ही भारतीय राज्यघटनेतील खऱ्या भारतीय आचार आणि धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे वानखेडे कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, समीर आणि क्रांती यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत, हा लग्नसोहळा हिंदू पद्धतीने केल्याचंही त्यांनी फोटोसह सांगितलं.
नवाब मलिक दुबई दौऱ्यावर
नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा नवाब मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.