Join us

Aryan Khan Drug Extortion Case: शिवसेनेचा ‘तो’ मंत्री कोण?; आर्यन खान वसुली प्रकरणात मोहित कंबोज यांचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 10:24 AM

कोर्टासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि जे सत्य आहे त्यात काय अंतर आहे? लोकांना खरं कळायला हवं. गुन्हेगारांना वाचवू नका अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला एका क्रुझवरील छापेमारीत अटक करण्यात आली होती. NCB ने केलेल्या या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप मंत्री नवाब मलिकांनी केले. या प्रकरणी काही लोकांनी पुढे येत आर्यन खानला अडकवून शाहरुखकडून पैसे काढण्याचा कट रचला होता असा आरोप केला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक(SET) नेमलं होतं.( Aryan Khan Drug Extortion case)

आता नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी या प्रकरणी विशेष तपास पथकाला पुन्हा चौकशी सुरू करण्यास सांगितले असल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यावरून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. मुंबई पोलिसांची SET या प्रकरणात खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहे. त्यावर मोहित कंबोज म्हणाले की, मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तपास करून FIR दाखल करण्यात यावा. मला कधीही चौकशीसाठी बोलवा. माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. सलीम जावेदची स्टोरी बनवली गेली. आजच्या अधिवेशनातही काहीजण बसलेले आहे. हे देशासमोर उघड व्हायला हवं असं त्यांनी सांगितले.

तसेच सुनील पाटील, किरण गोसावी, प्रभाकर साईल, शिवसेनेचा एक मंत्री, काँग्रेसचे असे कुठले मंत्री आहेत? त्यांची या प्रकरणात काय भूमिका आहे? परेळच्या घटनेत कुणी समन्वय केला? याच्या अनेक चर्चा झाल्या परंतु हे प्रकरण दाबलं गेले. हे सत्य देशासमोर यायला हवं. काही लोकांचे जबाब नोंदवण्यात आले नाही. कोर्टासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि जे सत्य आहे त्यात काय अंतर आहे? लोकांना खरं कळायला हवं. गुन्हेगारांना वाचवू नका अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

१ ऑक्टोबरला आर्यन खान त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अभिनेत्री मुनमुन धमेचा यांना क्रूझ पार्टीतून ताब्यात घेण्यात आले होते. महिनाभर या प्रकरणाने धुरळा उडविला होता. या कारवाईमुळे तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले होते. नंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर खोट्या जात प्रमाणपत्राचे आरोप केले आहेत. महिनाभर हा मुद्दादेखील गाजला होता.

मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली होती. एएनआय वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान वसुली प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी थांबविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी २० जणांची चौकशी केली आहे, मात्र काही पुरावा सापडलेला नाही. यामुळे गुन्हादेखील दाखल करत आलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं.

आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी १८ कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिच्याकडे हे पैसे मागितले गेले होते. यानंतर सॅम डिसुझा नावाच्या एका व्यक्तीने दावा केलेला की किरण गोसावी, सॅम आणि पुजा ददलानी भेटले होते. या रकमेपैकी ५० लाख रुपये ददलानीने दिले होते. मुंबई पोलीस हे तिघे भेटले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते.

टॅग्स :आर्यन खानमुंबई पोलीसशिवसेनानार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो