Join us

Aryan Khan Drugs : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचाही वार, आर्यन खान ड्रग्जप्रकरणी महत्त्वाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 7:55 PM

Aryan Khan Drugs : नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

ठळक मुद्देएनसीबीकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूडमधील मंडळींना टार्गेट करुन कारवाया केल्याचा आरोपही केला जातो आहे. एनसीबीने मोठा गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला.

मुंबई - आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनीही याबाबत एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विशेषतः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकारच्या एजन्सींचा गैरवापर प्रचंड प्रमाणात सुरु आहे. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स यांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजीत कट असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्या सुद्धा याच कटाचा भाग आहेत, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

एनसीबीकडून गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूडमधील मंडळींना टार्गेट करुन कारवाया केल्याचा आरोपही केला जातो आहे. एनसीबीने मोठा गाजा वाजा करून क्रुझवरील ड्रग पार्टीचा पर्दाफाश केला. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीने या प्रकऱणी अटकही केली. मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी हा गुन्हेगार आणि मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर सैल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रूपये मागितले होते पण १८ कोटी रूपयात सौदा पक्का झाला होता असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच एनसीबी अधिका-यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याची तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसनाना पटोलेकाँग्रेस