Join us

Aryan Khan Drugs : पुराव्याला पुराव्यानेच उत्तर, ज्ञानदेव वानखेडेंनी कागदपत्रांची फाईलच काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:02 PM

माझ्या नातूच्या जन्म दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे हे नाव स्पष्ट दिसतंय. म्हणजे, माझ्या नातवाच्या दाखल्यावरही त्याच्या वडिलांच पूर्ण नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असंच आहे

ठळक मुद्देमाझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. माझ्याकडे शाळेपासून ते डिपार्टमेंट जॉईन केल्यापर्यंतचे अनेक पुरावे आहेत, ज्यामध्ये माझं नाव ज्ञानदेवच आहे, असे समीर यांच्या वडिलांनी सांगितले

मुंबई - एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक कथित जन्मदाखल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्या कथित जन्म दाखल्यामध्ये १४ डिसेंबर १९७९ अशी तारीख दिसत असून समीर आणि मुस्लिम असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं आहे. मात्र, आता ज्ञानदेव वानखेडेंनी पुराव्यानेच पुराव्याला उत्तर दिलंय. त्यांनी नावाची ओळख सांगणारी अख्खी फाईलच वाचून दाखवली आहे. 

माझ्या नातूच्या जन्म दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे हे नाव स्पष्ट दिसतंय. म्हणजे, माझ्या नातवाच्या दाखल्यावरही त्याच्या वडिलांच पूर्ण नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असंच आहे. माझं निवडणूक ओळखपत्र आहे, त्यावरही माझं नाव ज्ञानदेव हेच आहे. माझ्या पत्नीच्या मृत्यूपूर्वीचे हे कागदपत्र आहे, त्यावरही झाहिदा ज्ञानदेव वानखेडे असंच लिहिलेल आहे, त्यामध्ये तिने स्वखुशीने धर्म बदलल्याचंही सांगितलंय, अशा विविध कागदपत्रांचा पुरावाच ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियासमोर दाखवला आहे. त्यामुळे, नवाब मलिक हे स्पष्टपणे खोटं बोलत आहेत, हे दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. माझ्याकडे शाळेपासून ते डिपार्टमेंट जॉईन केल्यापर्यंतचे अनेक पुरावे आहेत, ज्यामध्ये माझं नाव ज्ञानदेवच आहे, असे समीर यांच्या वडिलांनी सांगितले. तसेच, जावयाला आत टाकल्यापासून मलिक समीरच्या मागे लागलाय. तो मंत्री आहे, सरकार त्याचं आहे, तो मोठा माणूसयं, मग तो काहीही करू शकतो. नाव बदलू शकतो, जन्म दाखलाही बदलू शकतो, असे म्हणत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. 

माझा मुलगा स्वच्छ चारित्र्याचा

माझा मुलगा स्वच्छ चारित्र्याचा आहे, मी आत्ताही फोटो दाखवू शकतो. माझं गावातलं घर कुडाचं आहे, जर हा पैसे घेणारा असता तर आज आम्ही श्रीमंत असतो. गेल्या 15 वर्षात याने कधीही पैसे घेतले नाहीत, अन् पुढेही घेणार नाही. माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. माझा मुलगा वकील आहे, त्याच्या जिद्द आहे, तो देशसेवा करतोय. पण, असे आरोप होत असतील, जीवावर बेतत असेल तर हे सगळं प्रकरण संपल्यावर मी त्याला राजीनामा द्यायला सांगेन, असेही ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते नबाव मलिक

वानखेडे यांचा तरुण असतानाचा मुस्लिम पद्धतीने केलेल्या विवाहाचा फोटो ट्विट करत त्यावर पैचान कौन? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये एक कागदही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. ट्विट करून ''यहाँ से शुरू होता है फर्जीवाडा'' असं नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचदरम्यान समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे.  

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकमुंबईनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोगुन्हेगारी