Aryan Khan Drugs Case: शाहरुखच्या मॅनेजरचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती, २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 10:52 AM2021-11-04T10:52:14+5:302021-11-04T10:52:43+5:30
अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटी रुपायांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर करण्यात आला आहे.
मुंबई-
अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटी रुपायांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर करण्यात आला आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला मोठं यश आलं आहे. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्यामुळे या प्रकरणात खंडणीचा गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईलनं उघड केलेल्या माहितीला कुठेतरी दुजोरा मिळताना दिसत आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणात आता गुन्ह्याची नोंद करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आर्यन खानला सोडवण्यासाठी मुंबईतील लोअर परळ याच भागात २५ कोटी रुपयांचं डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईल यानं केला होता. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता एक धक्कादायक फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. यात मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची निळ्या रंगाची मर्सिडिज कार दिसून आली आहे. मुंबई पोलीस आता या पुराव्याच्या जोरावर पुजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदविण्याची शक्यता आहे.
मुंबईतील क्रूझ पार्टीवरील ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल यानं पुढे येत एनसीबी, किरण गोसावीवर खळबळजनक आरोप केले आहेत. यात प्रभाकर साईल यानं आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली होती. यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत असं किरण गोसावी सॅम डिसोजा याला सांगत असल्याचं आपण ऐकलं होतं, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल यानं केला होता. पोलिसांनी याप्रकरणात चौकशीला सुरुवात केली असता लोअर परळ भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.